राहुल गांधींसोबतची ही तरुणी कोण? राहुल गांधींसोबत `हिजाब गर्ल` मुस्कान?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे, काय आहे फोटोचं व्हायरल सत्य
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. राहुल गांधींसोबत जी तरुणी दिसतेय, ती हिजाब गर्ल बिबी मुस्कान असल्याचा दावा केला जात आहे. पण खरंच ती हिजाब गर्ल मुस्कान आहे का? काय आहे या फोटोचं व्हायरल सत्य.
कर्नाटकच्या मंडयामधील कॉलेजात शिकणारी हिजाब गर्ल बिबी मुस्कान खान. गळ्यात भगवी उपरणी घालून तरुणांचा जमाव जय श्रीरामच्या घोषणा देत होता. तर ही हिजाब गर्ल अल्ला हू अकबरचे नारे देत होती. हा व्हिडिओ सगळ्यांनीच पाहिला असेल.
पण आता काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत असलेल्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या महिलेच्या गळ्यात काँग्रेसचं निवडणूक चिन्ह असलेला स्कार्फ दिसतोय. ही तरुणी हिजाब गर्ल मुस्कान असल्याचा दावाही केला जात आहे. कर्नाटकात सुरू असलेला हिजाबचा वाद हा सगळा काँग्रेसचा खेळ असल्याची टिप्पणीही या फोटोवरून केली जात आहे.
झी २४ तासनं या फोटोचं व्हायरल सत्य शोधून काढायचं ठरवलं. राहुल गांधींनी गेल्या काही दिवसात कोणत्या नेत्यांना भेटी दिल्या, याची पाहणी झी २४ तासनं केली. तेव्हा ८ फेब्रुवारी २०२२ रोजीचा फोटो आढळला. झारखंडमधील काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीचा हा फोटो आहे. झारखंडचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला होता.
राहुल गांधींसोबत ही तरुणी कोण?
या तरुणीचं नाव अंबा प्रसाद असल्याची बाब स्पष्ट झाली. २९ वर्षांची अंबा प्रसाद झारखंडमधील काँग्रेसची सर्वात तरुण आमदार आहे. बडकागाव विधानसभा मतदारसंघाची ती आमदार आहे घोड्यावर बसून विधानसभेत पोहोचल्यानं ती चर्चेत आली होती
याचाच अर्थ राहुल गांधींसोबत असलेली तरुणी हिजाब गर्ल बिबी मुस्कान असल्याचा दावा असत्य ठरलाय.
झारखंडमधील काँग्रेस आमदार अंबा प्रसाद यांना हिजाब गर्ल बिबी मुस्कान समजून सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग करण्यात आलं. मात्र झी २४ तासच्या व्हायरल चेकमध्ये हा दावा असत्य ठरला. त्यामुळं आधी नीट शहानिशा करूनच कोणताही फोटो सोशल मीडियावर अपलोड करा...नसत्या अफवांना बळी पडू नका...