शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना! खतांपासून ते ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार मोठी सवलत
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. या क्रमाने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, खते, बियाणे खरेदी करण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. या योजनांचा लाभ कसा घ्यायचा त्याबाबत सविस्तर माहिती...
नवी दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अनेक योजना सरकारच्या वतीने सुरू आहेत. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्यात येत आहेत. याशिवाय सरकार अशा अनेक योजना चालवत आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळत आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजना
या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. या योजनेत 2000 रुपयांचे 3 हफ्ते म्हणजेच 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून CSC मध्ये नोंदणी करू शकता. याशिवाय पीएम किसान GOI मोबाइल अॅपवरही नोंदणी करू शकतात.
पीएम पीक विमा योजना
वादळ, दुष्काळ, पाऊस, भूकंप, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून देशातील शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झाले असेल आणि त्याचा विमा या योजनेत असेल तर त्याला शासनाकडून 40,700 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
किसान क्रेडिट योजना
शेतकऱ्यांना बियाणे, खते, युरिया यासारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी सुलभ कर्ज मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 4 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
किसान ट्रॅक्टर योजना
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर निम्मे अनुदान देत आहे. या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची केवळ निम्मी किंमत मोजावी लागणार आहे, तर निम्मी किंमत शासन भरणार आहे.
तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बँक तपशील, जमिनीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.