Punjab Crime : पंजाबसह दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात काही भागात शेतातील पेंढा आणि खुंटं जाळल्याने दरवर्षी दिल्लीमध्ये प्रदूषणात चिंताजनक वाढ होत असते. वारंवार कारवाई करुन देखील शेतकरी पेंढा जाळतच असतात. यंदाच्या वर्षीदेखील पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात भुसा जाळण्याचे प्रकार सुरु आहेत. अशातच पंजाबमधील भटिंडा येथे शेतातील पेंढा जाळणाऱ्यांना थांबवण्यासाठी आलेल्या सरकारी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांनी घेराव घातला. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याला ओलीस ठेऊन शेतातील पेंढा पेटवून दिला आणि नंतर त्याला सोडून दिले. शेतकऱ्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या संपूर्ण घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे पंजाब पोलिसांनी भटिंडा येथील काही शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबमधील भटिंडा येथून ही लाजिरवाणी घटना समोर आली आहे. भटिंडा इथल्या मेहमा सर्जा गावातील शेतकर्‍यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला पेंढा जाळण्यास भाग पाडले. शुक्रवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक शेतात भुसा जाळण्याचे प्रकार थांबवण्यासाठी गावात गेले होते.
पथक येताच भारतीय किसान युनियनच्या सिद्धुपूर युनिटचे सदस्य जमा झाले आणि त्यांनी अधिकाऱ्याला घेराव घातला. त्यानंतर अधिकाऱ्याने शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र किसान युनियनच्या सदस्यांनी काहीही न ऐकता अधिकाऱ्यालाच शेतातील पेंढा जाळायला लावला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


नेमकं काय घडलं?


पीडब्ल्यूडी पथकाचे अधिकारी शेतात आल्यावर शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पीडब्ल्यूडी अधिकारी हरप्रीत सिंग यांना जबरदस्तीने पेंढा जाळण्यास सांगितले. हरप्रीत यांनी विरोध केला आणि पेंढा जाळण्यास नकार दिला. शेतकऱ्यांनी हरप्रीत यांना पत्र लिहिण्यास सांगितले की, ते शेतकऱ्यांचा भुसा जाळण्यापासून थांबवणार नाही, पण त्यांनी तसे केले नाही.



याप्रकरणी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'तुम्ही कोणता मार्ग अवलंबला? हा सरकारी कर्मचारी पेंढा न जाळण्याचा संदेश घेऊन गेला आणि त्याला तो पेटवून द्यायला लावला. गुरूसाहेबांनी हवेला गुरूचा दर्जा दिला आहे.हा दर्जा नष्ट करण्यासाठी आम्ही हातात काठ्या घेऊन आमच्या मुलांचा ऑक्सिजन नष्ट करण्यात गुंतलो आहोत,' असे मान यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, 2 नोव्हेंबरपर्यंत पंजाबमध्ये 11 हजार 262 पेंढा जाळण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. प्रदूषण मंडळाच्या अहवालानुसार, यापैकी अधिकाऱ्यांनी केवळ 5,265 ठिकाणांना भेटी दिल्या आहेत, त्यापैकी 3,375 पीक जाळण्याशी संबंधित आहेत. एकट्या भटिंड्यातच 434 पेंढा जाळण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यापैकी अधिकाऱ्यांनी 108 घटनास्थळांना भेटी दिल्या आहेत. अहवालानुसार भटिंडातील 81 घटना पेंढा जाळण्याशी संबंधित आहेत.