`आम्हाला वाट द्या अन्यथा....`; दिल्लीच्या दिशेनं कूच करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्टच सांगितलं
Farmers Protest : देशातील शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेनं कूच करत असतानाच या मोर्चाच्या धर्तीवर पोलीस यंत्रणाही सतर्क दिसतस आहेत.
Farmers Protest Latest News : पंजाबमधून हजारोंच्या संख्येनं शेतकरी त्यांच्या काही मागण्यांसह दिल्लीच्या (Delhi) दिशेनं निघाले असून, त्यांनी आपल्या कृतीतून सरकारविषयी असणारी नाराजी स्पष्ट शब्दांत मांडली आहे. शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी एकंदर चित्र पाहता शेतकरी नेता सरवन सिंह पंधेर यांनी काही गोष्टी अधिक स्पष्टपणे सांगितल्या आहेत.
'शेतकऱ्यांना त्यांचा मुद्दा मांडण्याची संधी द्यावी. आम्हाला स्थानिकांचाही पाठिंबा आहे, त्यामुळं हे आंदोलन असंच सुरु राहणार आहे. सरकारनं आम्हाला आता पुढे जाऊ द्यावं. तरच हे आंदोलन हिंसोच्या वाटेवर जाणार नाही यासाठी आमचा प्रयत्न असेल, सरकारनं आमचं म्हणणं ऐकावं....', असं पंधेर म्हणाले.
शंभू बॉर्डरजवळ मोठा संघर्ष
मंगळवारी दिल्लीच्या वेशीवर धडकणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा करण्यात आला होता. पंजाबच्या अंबालात शंभू बॉर्डरजवळ अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यास प्रत्युत्तरादाखल शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. शंभू बॉर्डरवर परिस्थिती इतकी चिघळली की शेतकरी-पोलीस यांच्यात जोरदार संघर्ष झाला. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाच्या 'चलो दिल्ली' आंदोलनाला गालबोट लागलं.
सध्या पंजाब हरयाणातील लाखो शेतकरी दिल्लीकडे कूच करता आहेत. यामुळे दिल्लीच्या सीमांवर वाहतूक कोंडी पहायला मिळतेय. डीएनडी आणि चिल्ला बॉर्डरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीसुद्धा असंच एक आंदोलन झालं होतं. त्यावेळी सरकारनं मान्य केलेल्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत, एमएसपीचा मुद्दा सरकार दुर्लक्षितच ठेवत असून, असे अनोक आरोप संयुक्त किसान मोर्चानं केले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात असाच सूर आळवत सध्या हे शेतकऱ्यांचं वादळ दिल्लीच्या दिशेनं थेच सरकारलाच सवाल करण्यालाठी पुढे सरसावताना दिसत आहे.
हेसुद्धा वाचा : Valentines day : प्रिय व्यक्तीला द्या अविस्मरणीय भेट; TATA Nexon ev ची किंमत एक लाखांनी कमी
इथं मागण्या मान्य झाल्या नाहीत असा सूर शेतकरी मोर्चानं आळवला असला तरीही त्यांच्या 13 पैकी 10 मागण्या मान्य केल्याचा दावा केंद्र सरकारनं केला आहे. याशिवाय 3 मागण्यांवर विचार करण्याचं आश्वासनी दिलं आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर आणि या आंदोलनावर ठाम असून त्यांची संख्या पाहता सरकारनं जोरदार तयारी सुरु केली आहे. दिल्लीच्या सर्व सीमांवर बॅरिकेट्स घालण्यात आलेत. खबरदारीचा उपाय म्हणून टोकदार तारांचं कुंपणंही घालण्यात आलं आहे. सिँघु, टिकरी बॉर्डरवर सीआरपीएफचे हजारो जवान तैनात करण्यात आले आहेत.