40 दिवसात 7 वेळा साप चावला, तरुणाच्या दाव्याची पोलखोल... हैराण करणारी कहाणी
Fatehpur Snake Bite Case : गेल्या काही दिवसात एका बातमीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूर इथं राहाणाऱ्या एका तरुणाने 40 दिवसात आपल्याला 7 वेळा सर्पदंश केल्याचा दावा केला होता. या बातमीने देशभरात चर्चा खळबळ उडाली होती.
Fatehpur Snake Bite Case : देशात दररोज राजकारण, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रात घडामोडी घडत असतात. यातल्या काही घडामोडींच्या बातम्या होतात आणि त्यावर चर्चाही रंगते. पण गेल्या काही दिवसात या सर्वांपासून वेगळ्या अशा एका बातमीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. खरंच असं घडू शकतं का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले. तज्ज्ञ, डॉक्टर, संबंधित क्षेत्रातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या गेल्या. कारण ही बातमीच वेगळी होती. 40 दिवसात सात वेळा साप चावल्याचा दावा एका तरुणाने केला होता. उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूरमध्ये (Fatehpur) राहाणाऱ्या एका तरुणाने हा दावा केला. पण या बातमीने केवळ उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली. यानिमित्ताने सिनेमात दाखवतात तसं खरच साप बदला घेतो का असा सवाल उपस्थित झाला.
काय आहे दाव्यामागचं सत्य?
उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूरमध्ये राहाणाऱ्या या तरुणाचं नाव विकास असं असून त्याने 40 दिवसात 7 वेळा सात चावल्याचा दावा (Snake Bite) केलाय. विकासने दावा केल्यानंतर आरोग्य विभाग आणि वन विभागाने चौकशी सुरु केली. त्यांच्या तपासात विकासचा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. या तरुणाला एकदाच साप चावला होता. हा तरुण मनोरुग्ण असून तो स्नेक फोबियाचा बळी ठरल्याचं आरोग्य विभागाने म्हटलंय. फतेहपूर आरोग्य विभागाने विकासने सात वेळा साप चाव्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. विकासला एकदाच साप चापला होता. पण यानंतर त्याच्या मनात सापाची भीती बसली आणि यातून त्याने सहा वेळा आपल्याला साप चावल्याचं सांगितलं.
विकासची मानसिक आजाराचा बळी असून त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले जातील, असे आरोग्य विभागाने सांगितलं आहे.
40 दिवसात 7 वेळा साप चावला
2 जूनला विकासला पहिल्यांदा साप चावला. विकास आपल्या घरी बेडवरुन खाली उतरला, त्याचवेळी त्याला सापाने दंश केला. कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं, त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि यातून तो बरा झाला. पण यानंतर चार ते पाच दिवसांच्या अंतराने त्याने आपल्याला साप चावत असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर आपल्या स्वप्नातही साप आला आणि त्याने नऊ वेळा चावणार असल्याचं सांगितलं. नवव्या वेळी तुझा मृत्यू अटळ असल्याचं सापाने सांगितलं. तुझा जीव कोणीच वाचवू शकत नाही. डॉक्टर, तांत्रिक, मांत्रिक किंवा पंडीतही तुला माझ्यापासून वाचवू शकत नाहीत असं सापाने स्वप्नात आपल्याला सांगितल्याचा दावा विकासने केला.
डॉक्टरांनी दिला दुसरीकडे राहाण्याचा सल्ला
तीन ते चार तास आधी आपल्याला साप चावणार असल्याचा आभास होतो. याबाबत कुटुंबालाही सांगतो, पण यानंतरही साप चावत असल्याचं विकासचं म्हणणं आहे. यावर डॉक्टरांनी त्याला काही दिवस घर सोडून दुसरीकडे राहाण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विकास आपल्या मावशीकडे राधानगरी इथे राहाण्यासाठी गेला. पण तिथेही सापाने त्याचा पिछा सोडला नाही. पाचव्यांदा सापाने त्याचा चावा घेतला. सातव्यांदा जेव्हा त्याला साप चावला त्यावेळी तो आपल्या काकांच्या घरी होता असं त्याने म्हटलंय.
पण तपासानंतर तरुणाचा हा सर्व दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. विकासला स्नेक फोबिया झाला असून त्याच्यावर उपचार केले जाणार आहेत.