मुंबई : राज्यातल्या महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. महाविकास आघाडीच्या ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली, यात २६ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या ८ जणांनी कॅबिनेट तर ४ जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या १४ जणांनी शपथ घेतली, यात १० कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. काँग्रेच्या ८ जणांनी कॅबिनेट आणि २ जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंच्या या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. वडील मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे. तर देशभरात याआधी ३ वेळा वडिलांच्या मंत्रिमंडळात मुलाची वर्णी लागली होती.


करुणानिधी-स्टालिन


तामीळनाडूच्या राजकारणात सगळ्यात आधी वडील आणि मुलाची जोडी एकाच मंत्रिमंडळात पाहायला मिळाली. २००६ साली तामीळनाडूमध्ये डीएमकेचं सरकार आलं तेव्हा करुणानिधी मुख्यमंत्री झाले. वडिलांच्या मंत्रिमंडळात एमके स्टालिन यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. २००६ ते २००९ पर्यंत स्टालिन ग्रामविकासमंत्री आणि स्थानिक प्रशासन मंत्री राहिले, तर २००९ ते २०११ पर्यंत स्टालिन यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं.


बादल जोडी एकाच मंत्रिमंडळात


पंजाबमध्ये २००७ साली अकाली दलचं सरकार आलं तेव्हा प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रकाशसिंग बादल यांनी २००८ साली अकाली दलची धुरा मुलगा सुखबीरसिंग बादल यांच्याकडे सोपवली. एका वर्षानंतर म्हणजेच २००९ साली बादल सरकारमध्ये सुखबीरसिंग बादल यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. निवडणूक न लढल्यामुळे ६ महिन्यांमध्येच सुखबीरसिंग बादल यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर २००९ मध्येच सुखबीरसिंग यांनी पुन्हा निवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकून सुखबीरसिंग पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले.


यानंतर पुन्हा २०१२ साली अकाली दलचं सरकार आलं तेव्हा प्रकाशसिंग बादल मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा सुखबीरसिंग बादल यांच्याकडचे उपमुख्यमंत्रीपद आलं. या मंत्रिमंडळात सुखबीरसिंग यांच्याकडे गृहखातं, प्रशासकिय सुधारणा, गृहनिर्माण, महसूल आणि कर, गुंतवणूक प्रोत्साहन, क्रीडा आणि नागरी उड्डाण ही खाती देण्यात आली.


केसीआर-केटीआर


तेलंगणा वेगळं राज्य झाल्यानंतर अजूनपर्यंत केसीआर-केटीआर ही पिता-पुत्राची जोडी सत्तेत आहे. २०१४ साली तेलंगणा वेगळं राज्य झालं आणि पहिल्याच निवडणुकीत टीआरएसचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर केसीआर मुख्यमंत्री झाले. केसीआर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात मुलगा केटीआरना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. केटीआर यांनी पहिल्या टर्ममध्ये माहिती आणि तंत्रज्ञान तसंच पंचायत राज ही खाती सांभाळली. २०१६ साली केटीआरना महापालिका प्रशासन आणि नगरविकास ही खाती देण्यात आली.


२०१८ साली पुन्हा एकदा तेलंगणामध्ये टीआरएसचंच सरकार आलं. यावेळीही केसीआर मुख्यमंत्री आणि केटीआर कॅबिनेट मंत्री झाले आहेत. यावेळीही त्यांना महापालिका प्रशासन, नगरविकास, उद्योग आणि वाणिज्य, माहिती आणि तंत्रज्ञान ही खाती देण्यात आली.