Delhi Crime News: दिल्लीतील प्रेम नगरमध्ये आपल्या सुनेवर सासऱ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने विटेने अनेकदा आपल्या सुनेच्या डोक्यावर हल्ला केल्याचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ही घटना मागील मंगळवारी घडल्याचे समजते. प्रेम नगरमधील या व्यक्तीने दिवसाढवळ्या आपल्या आपल्या सुनेच्या डोक्यात अनेकदा विटेने वार केले. या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या महिलेच्या डोक्याला 17 टाके पडले आहेत. बुधवारी या प्रकरणामध्ये महिलेच्या वडिलांनी तिच्या सासऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल करण्यासाठी या महिलेचे वडील खास फरीदापूरवरुन प्रेमनगरला आले. पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.


कशामुळे झाला वाद?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित महिलेचं नाव काजल असं असून ती 26 वर्षांची आहे. काजलचं लग्न प्रवीण कुमारशी झालं आहे. प्रवीण सिव्हिल डिफेन्समध्ये कामाला आले. काजल नोकरीसाठी मुलाखत द्यायाला जाणार होती. मात्र तिच्या सासऱ्यांचा याला विरोध होता. काजलने मुलाखतीसाठी जाऊ नये असं तिच्या सासऱ्यांचं म्हणणं होतं. याच मुद्द्यावरुन या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यातूनच दोघांमध्ये हाणामारी झाली.


पतीनं नेलं रुग्णालयात


वडील आणि पत्नीचा वाद झाल्याचं प्रवीणला घरी आल्यानंतर समजलं. त्याने तातडीने काजलला रुग्णालयामध्ये नेलं. पत्नी शिडीवरुन पडल्याचं त्याने डॉक्टरांना सांगितलं आणि काजलवरुन उपचार करुन घेतले.मात्र काजलने पूर्णपणे शुद्धीवर आल्यावर आपल्याला सासऱ्यांनी विटेने मारल्याचं सांगितलं. त्यानंतर काजलला संजय गांधी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करुन घेतली. या महिलेच्या डोक्याला 17 टाके पडले आहेत. तसेच या महिलेच्या हातालाही गंभीर दुखापत झाली आहे.


वडील म्हणतात, "...म्हणून तिला नोकरी करायची इच्छा"


काजलचे वडील सत्यप्रकाश यांनी माझ्या मुलीला सासरच्या लोकांनी बेदम मारहाण केल्याचं म्हटलं आहे. "आम्ही आमच्या ऐपतीनुसार लग्न लावून दिलं. मात्र मागील काही वर्षांपासून माझ्या मुलीच्या सासरचे लोक तिला सातत्याने त्रास देत होते. मुलीला आणि जावयला त्यांनी घरातून बाहेर काढलं होतं. त्यानंतर हे दोघेही जवळच एका घरात भाड्याने राहत होते. मात्र सासरे आणि सासरची इतर मंडळी कायम यांच्या घरावर लक्ष ठेऊन असायची. माझ्या जावयचा पगार केवळ 20 हजार रुपये इतका आहे. यापैकी अर्ध्याहून अधिक रक्कम तो त्याच्या आई-वडिलांना देतो. केवळ 10 हजारांमध्ये भाड्याच्या घरात राहून संसार करणं फार कठीण होतं. घरातील याच परिस्थितीमुळे माझ्या मुलीने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिच्या सासऱ्याचा याला विरोध होता. त्यामुळेच त्याने माझ्या मुलीवर हल्ला केला. या प्रकरणातील आरोपींना काठोर शिक्षा झाली पाहिजे," अशी मागणी सत्यप्रकाश यांनी केली आहे.