चिकन करी खाण्यावरुन झालेल्या वादातून बापानेच केली 32 वर्षीय मुलाची हत्या
Karnatak Fight Over Chicken Curry: या संपूर्ण घटनेनंतर मृत व्यक्तीची पत्नी आणि 2 मुलं निराधार झाले आहेत. घरातील करत्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने मुलांची जबाबदारी या महिलेच्या खांद्यावर पडली आहे.
Father Killed Son Fight Over Chicken Curry: संतापलेल्या अवस्थेत मनुष्य काय करेल याचा नेम नाही. अनेकदा रागावर ताबा न मिळवल्याने हातून एखादी अशी गोष्ट घडते की पश्चाताप करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उरत नाही. असाच काहीसा प्रकार कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यात एका कुटुंबामध्ये घडला. येथे चिकन करी खाण्याच्या विषयावरुन झालेल्या वादातून एकाची हत्या झाली. या वादामध्ये 32 वर्षीय तरुणाला त्याच्या बापाने बांबूने एवढी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली असून हा संपूर्ण प्रकार सुलिया तालुक्यातील गुट्टीगरमध्ये घडला.
आधी वाद मग मारहाण
मरण पावलेल्या मुलाचं नाव शिवराम असं आहे. घरी बनवलेल्या चिकन करी खाण्याच्या विषयावरुन वाद निर्माण झाला. शिवराम आणि त्याचे वडील शीना यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. आवाज वाढवून एकमेकांशी वाद घालणाऱ्या या दोघांचा वाद हाणामारीपर्यंत गेला. त्यावेळी संतापलेल्या शीना यांनी बाजूला पडलेला बांबू घेतला आणि त्याने शिवरामला मारायला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये शिवराम गंभीर जखमी झाला.
पत्नी आणि मुलं झाली निराधार
बापाने मारलेला एक फटका शिवरामच्या डोक्यावर लागला. जबर जखमी झालेल्या शिवरामचा जागीच मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात स्थानिक पोलिसांना कळवण्यात आलं. घटनास्थळी दाखल झालेल्या सुब्रह्मण्य पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शिवरामच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. शिवरामचे वडील त्याच्याबरोबर राहत होते. शिवरामच्या आईचं पूर्वीच निधन झालं आहे. त्यामुळे या दोघांच्या वादामध्ये शिवरामच्या पत्नीला मध्यस्थी करता आली नाही आणि या वादात घरातील करत्या पुरुषाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाप आणि मुलामध्ये किरकोळ वाद झाला आणि त्यामधून मुलाचा मृत्यू झाला यावर गावातील अनेकांचा विश्वासच बसत नाहीय. शिवरामच्या पत्नीला या संपूर्ण प्रकरणामुळे मोठा धक्का बसला आहे. सासऱ्यांच्या हातून पतीचा मृत्यू झाल्याने आता दोन्ही मुलांची जबाबदारी तिच्याच खांद्यावर आली आहे. सासरे तुरुंगामध्ये आणि पतीचा आधार हरपल्याने शिवरामची पत्नी कोलमडून पडली आहे.