नवी दिल्ली : कोरोनाची भीती इतकी वाढली आहे की, लोकं आता रस्त्यावर पडलेल्या नोटा देखील उचलत नाही आहेत. दिल्लीच्या बुद्ध विहार भागात अशीच एक घटना समोर आली आहे. रस्त्यावर २ हजारांच्या नोटा पडल्या होत्या. पण कोणी उचलण्याचूी हिंमत देखील केली नाही. २ हजाराच्या ७ नोटा रस्त्यावर पडल्याचं अनेकांनी पाहून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोज वाढत चालली आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कोणाला कोरोनाची लागण आहे हे कळणं कठीण आहे. त्यामुळे लोकं अधिक काळजी घेत आहेत. सामान्यपणे रस्त्यावर १० रुपयाची नोट जरी कोणाला दिसली तरी ती लोकं उचलतात. पण आज देशात परिस्थिती अशी आहे की, लोकं कोणत्याही वस्तूला हात लावताना विचार करत आहेत. 


काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये नोटांना थुंकी लावून टाकण्यात आल्याचं दिसत होतं. त्यामुळे आजच्या घटनेत लोकांनी या नोटा उचलण्याचं धाडस केलं नाही.


बराच वेळ गोंधळ चालल्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या नोटांवर दगडं ठेवली. त्यानंतर एक व्यक्ती काही वेळेत तेथे आला आणि त्याने त्याच्या खिशातून हे पैसे पडल्याचं सांगितलं. या व्यक्तीने एटीएममधून पैसे काढले होते. पण खिशात ठेवताना त्या नोटा त्याच्या खिशातून खाली पडल्या. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ७ नोटा त्या व्यक्तीला दिल्या.