नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचं वित्त मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अनेक दिवसांपासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 30 टक्क्यांपर्यंत कपात केली जाणार असल्याची अफवा पसरत होती. परंतु ही पूर्णपणे अफवा असून सरकारकडून यााबाबत कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याचं वित्त मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वित्त मंत्रालयाने ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात कपात केली जाईल, अशी अफवा पसरवली जात होती. परंतु त्याला कोणताही आधार नाही. कोणत्याही वर्गातील केंद्रीय कर्मचाऱ्याच्या सध्याच्या पगारात, कपात करण्याचा सरकारचा विचार नसल्याचं, वित्त मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय अशाप्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही सांगण्यात आलं आहे.



यापूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पेन्शनमध्ये कपात आणि सेवानिवृत्तीचं वय कमी करण्याबाबतही अफवा पसरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर वित्त मंत्रालयाने ट्विट करुन या अफवा असून याबाबतही स्पष्टीकरण दिलं होतं. 


दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. सरकारने गेल्या काही दिवासांमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदारांच्या वेतनात कपात केली आहे. त्याशिवाय राज्यांकडूनही आमदार आणि मोठ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपातीची घोषणा करण्यात आली. या घोषणांनंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनाही कपात करण्याबाबत अफवा पसरु लागल्या होत्या. मात्र आता वित्त मंत्रालयाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.