मुंबई - मतदान करणे अतिशय महत्वाचे आणि जबाबदारीचे काम आहे. एप्रिल- मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. उत्तम लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करणे गरजेचे असते. परंतु, मतदान यादीत नाव नसल्यामुळे अनेकांचे नुकसान होते. मतदान यादीत अर्ज करुनही यादीत नाव नाही, किंवा एकाच संबधित व्यक्तीचे नाव यादीत जास्त वेळा असल्याची माहिती समोर आली आहे. काही लोकांचे नाव मतदार यादीतून वगळल्यामुळे दिल्लीत राजकीय पक्षांनी आंदोलन केले होते. यावेळी मतदान यादीत आपले नाव असेल की नाही? असा प्रश्न नागरिकांच्या समोर निर्माण झाला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने मतदान यादीत आपले नाव आहे की नाही तपासण्यासाठी एक चांगली युक्ती शोधली आहे.


मतदान यादीतील नावाची तपासणी करण्यासाठी नागरिकांना कामावर रजा घ्यावी लागते. परंतु, घरात बसून मतदारयादीत आपल्या नावाची तपासणी करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने आणली आहे. यानंतर नागरिकांना मतदार केंद्रात जाण्याची गरज भासणार नाही. नागरिकांना मोबाईलच्या एका संदेशाच्या माध्यमातून सर्व माहिती मिळणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने १९५० हा टोल फ्री नंबर सुरु करणार आहे. २५ जानेवारीला 'वोटर्स डे'च्या निमित्ताने या टोल फ्री नंबरचे अनावरण करण्यात येणार आहे. नागरिकांना यादीसह त्याच्या ओळखपत्रात असलेले चुकीचे तपशील ऑनलॉइन दुरुस्त करता येणार आहेत.