हैदराबाद : आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील हॉटेलला भीषण आग लागली. अग्निशमनदलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. हे हॉटेल कोविड सेंटर म्हणून वापरले जात होते. हॉटेलमध्ये अडकलेल्या इतर लोकांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. हॉटेल गोल्डन पॅलेसमध्ये ही आग लागली होती. हॉटेलमध्ये 40 लोकं होती. ज्यामध्ये कोरोनाचे 30 रुग्ण आणि 10 जण हॉस्पिटल कर्मचारी होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजयवाडा पोलिसांनी म्हटलं की, या आगीत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 30 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. आगीवरही नियंत्रण मिळवले आहे. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी स्वत: संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत आणि जखमींना अधिक चांगले उपचार देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आला आहे.


कृष्णाचे जिल्हाधिकारी मोहम्मद इम्तियाज यांनी म्हटलं की, 'ही घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली. सुमारे 22 रूग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही संपूर्ण इमारत रिकामी केली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आम्ही पुढील तपास करत आहोत.'



आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. यासह त्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हॉटेल एका खासगी रुग्णालयाने भाड्याने घेतले होते, प्राथमिक तपासणीत कोरोना रूग्णांना येथे उपचारासाठी ठेवल्याचे समोर आले आहे.