श्रीनगर : पवित्र अमरनाथ गुहेमध्ये दरवर्षी तयार होणाऱ्या अदभूत अशा बर्फाच्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून हजारो भाविकांची या मार्गाने रिघ लागेत. ज्यासाठी अमरनाथ यात्रेचं आयोजन करण्यात येतं. यंदाच्या वर्षीही हा पर्वत सर करत अनेक श्रद्धाळू यात्रेसाठी सज्ज झाले आहेत. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अमरनाथ यात्रेसाठीची पहिली तुकडी जम्मू येथील बेस कॅम्पवरुन रवाना करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही सुरक्षेचे सर्व निकष लक्षात घेत अमरनाथ यात्रेसाठीची पहिली तुकडी रवाना करण्यात आली आहे', अशी माहिती राज्यपाल सल्लागार  के.के. शर्मा यांनी दिली. सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही शनिवारीच बालताल आणि पहलगाम येथे गेलो होतो. सर्व व्यवस्था अगदी योग्य प्रकारे करण्यात आल्या असून, जम्मू- काश्मीर मार्गामध्ये भक्तांच्या सोयीसुविधांची काळजी घेण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 


यात्रेचं महत्त्व आणि होणारी अपेक्षित गर्दी पाहता सुरक्षेच्या सर्व गोष्टींवर अधिक लक्ष देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय स्थानिकांकडून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी यात्रेकरुंना सहकार्य करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यात्रेकरुंनीही परिस्थिती लक्षात घेत वेळप्रसंगी सहकार्य करण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. 



हजारो जवान सुरक्षेसाठी तैनात 


समुद्रसपाटीपासून जवळपास १२, ७५६ फूट म्हणजेच ३८८८ मीटर उंचीवर असणाऱ्या अमरनाथ गुहेच्या परिसरात यंदाच्या वर्षी नेहमीपेक्षा जास्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांचा वाढता सुळसुळाट आणि सद्यस्थिती पाहता हे निर्णय घेण्यात आले आहेत. 


हॅलिकॉप्टर, सीसीटीव्ही कॅमेरा, आरआयएफ टॅग, बारकोड यांच्या सहाय्याने श्रद्धाळू आणि त्यांच्या वाहनांची काळजी घेण्यात येणार आहे. सोबतच प्रत्येक हालचालीवर करडी नजरही ठेवण्यात येणार आहे. हजारोंच्या संख्येने सश्स्तर जवान, ड्रोन, श्वानपथकही यात्रेसाठी तैनात ठेवण्यात आलं आहे. 


पहिलं दर्शन सोमवारी 


१५ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या यात्रेच पहिल्या तुकडीला सोमवारी दर्शनाची संधी मिळणार आहे. सर्वाधिक काळासाठी सुरु राहणाऱ्या काही कठिण यात्रांमध्ये अमरनाथ धान यात्रेचा समावेश होतो. फक्त पर्यावरणीय बदलच नव्हे तर, दहशतवादी हल्ले, खडतर वाट अशी अनेक आव्हानं या यात्रेत बऱ्याचदा सामोरी येतात. परिस्थितीचं एकंदर गांभीर्य पाहता प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर सावधगिरी बाळगत यात्रेची सर्व व्यवस्था करण्यात येते. यंदाच्याही वर्षी असंच चित्र पाहायला मिळत आहे.