अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मंदिराचं बांधकाम वेगाने सुरु असून आतील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान राम मंदिरात सोन्याचे दरवाजे लावले जात असून त्याचा पहिला फोटो समोर आला आहे. हा दरवाजा रामलल्लाच्या गर्भगृहाचा मुख्य दरवाजा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसात असे 13 आणखी दरवाजा लावले जाणार आहेत. राम मंदिरात लावण्यात आलेल्या या पहिल्या दरवाजासाठी हजार किलो सोन्याचा मुलामा वापरण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीराम जन्मभूमी मंदिरात नक्षीदार, कोरीव काम केलेले दरवाजे लावण्यात आले आहेत. दरवाजावर विष्णूचे कमळ, भव्यतेचे प्रतीक गज म्हणजेच हत्ती, अभिवादन मुद्रेतील देवी चित्रित करण्यात आली आहे. श्री राम मंदिराचे दरवाजे प्राचीन सागवान वृक्षांपासून बनवलेले आहेत. सोमवारी 3.22 मिनिटांनी पहिला दरवाजा उघडण्यात आला. या आठवड्यात सर्व दरवाजे बसवले जाणार आहेत. 



रामलल्लासाठी चांदीचा लेप असणारं सिंहासन


श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलल्लाच्या मंदिरात 44 दरवाजे असतील, त्यापैकी 14 दरवाजे सोन्याने मढवलेले असतील. यासोबतच 30 दरवाजांवर चांदीचा लेप लावण्यात येणार असून प्रभू रामलल्ला यांच्या सिंहासनावरही चांदीचा लेप लावण्यात आला आहे. म्हणजेच प्रभू श्रीराम ज्या सिंहासनावर बसणार आहेत, त्या सिंहासनावर चांदीचा थर लावण्यात आला आहे.


जेव्हा भक्त रामाचं दर्शन घेतील तेव्हा त्यांना दुरुनही रामलल्लाचं दर्शन मिळेल अशा भव्य प्रकारे हे सिंहासन तयार करण्यात येणार आहे. मंदिर उभारणीच्या कामात गर्भगृह पूर्णपणे तयार झाले असून पहिल्या मजल्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.