श्लोका झाली अंबानींची सून, असा पार पडला विवाहसोहळा
ते दोघंही एखादया परिकथेतील पात्रांप्रमाणेच दिसत आहेत.
मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या मुलाचा म्हणजेच आकाश अंबानी याचा विवाहसोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. श्लोका मेहता हिच्यासोबत आकाशने लग्नगाठ बांधली. अतिशय दिमाखदार अशा या विवाहसोहळ्याला अंबानी कुटुंबीयांमध्ये आनंद आणि उत्साहाची लाट पाहायला मिळाली होती. तर, उपस्थितांमध्ये असणारं आनंददायी वातावरणही काही लपून राहिलेलं नव्हतं.
सोशल मीडियावरही या विवाहसोहळ्याविषयीच्या अनेक चर्चांना उधाण आलेलं असताना अखेर नवविवाहित दाम्पत्य म्हणून श्लोका आणि आकाशचे फोटो अखेर सर्वांच्या नजरेस पडले. या फोटोंमध्ये आकाश आणि श्लोकाच्या चेहऱ्यावर असणारा आनंद पाहता ते दोघंही एखादया परिकथेतील पात्रांप्रमाणेच दिसत आहेत. लग्नाच्या निमित्ताने त्या दोघांनीही पारंपरिक पेहरावाला प्राधान्य दिलं होतं.
सोनेरी आणि पांढऱ्या अशा दोन रंगाची रंगसंगती असणारी शेरवानी आकाशने घोतली होती. तर, श्लोकाही लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये अगदी सुरेख दिसत होती. नववधू म्हणून तिच्या चेहऱ्यावर असणारी लकाकीही या लूकमध्ये खऱ्या अर्थाने चार चाँद लावत होती.
मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ कॉम्प्लेक्स येथे श्लोका आणि आकाशचा विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला बॉलिवूड, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थितीही पाहायला मिळाली होती.
२०१८ मध्येच त्या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. श्लोका आणि आकाशच्या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने फक्त भारतातच नव्हे तर, परदेशातही या विवाहसोहळ्याची धमाल पाहायला मिळाली होती. स्वित्झर्लंडच्या सेंट मोरित्झ य़ेथे या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने एका जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. जेथे बऱ्याच बी- टाऊन सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली होती.