VIDEO : उपचारानंतर भारतात दाखल झाल्यानंतर पर्रिकरांचं पहिलं ट्विट
चाहत्यांनी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी त्यांचे आभार मानलेत
पणजी : अमेरिकेतल्या १४ आठवड्यांच्या उपचारानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गोव्यात परतले आहेत. मायभूमीत परतल्यानंतर पर्रिकर यांनी लगेचच कामाला सुरुवात केलीय. उपचारानंतर आपली तब्येत आता बरी आहे असं सांगतानाच त्यांनी आपल्या चाहत्यांनी दिलेल्या भरभरून प्रेमासाठी त्यांचे आभार मानलेत. यासाठी त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ संदेशही आपल्या चाहत्यांना दिलाय.
'उपचारानंतर तुमच्या सर्वांच्या आशिर्वाद, पाठिंबा आणि प्रार्थनेमुळे मी पुन्हा एकदा कामावर रुजू झालोय. तुमचे आशिर्वाद असेच असू द्या... गोव्याच्या विकासासाठी मी तुमच्या सेवेत सादर झालोय, अशी मी खात्री देतोय' असा निरोप पर्रिकरांनी व्हिडिओतून आपल्या चाहत्यांना दिलाय.
अमेरिकेहून मुंबईमार्गे गोव्यात आलेले पर्रीकर खूप ताजेतवाने दिसत होते. गोवा विमानतळावर कार्यकर्ते आणि चाहत्यांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर ते प्रत्यक्ष सरकारी कामकाजात सहभागी होतील. १८ जूनच्या मुक्तिदिन सोहळ्यात ते सहभागी होणार असल्याचं प्रशासनानं सांगितलंय. त्यांच्या मागे गोवा सरकारचा कारभार चालवण्यासाठी तीन मंत्र्यांची समिती नेमण्यात आली होती.