बिहारच्या 12 जिल्ह्यांमध्ये पूर, आसामला ही पुराचा मोठा फटका
बिहार आणि आसाममधील पूर परिस्थिती भयानक
पटना : बिहार आणि आसाममधील पूर परिस्थिती भयानक आहे. बिहारमधील 12 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक गावं पुराच्या पाण्याखाली आहेत. गोपाळगंजमधील डुमरिया पुलाजवळ तटबंदी तुटल्याने पुराच्या पाणी गावामध्ये शिरले आहे. दिल्लीला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 28 देखील धोक्यात आला आहे. पूर्व चंपारणला गोपालगंजला जोडणारा डुमरिया पूल प्रशासनाने बंद केला आहे.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम्स बचाव कार्य करत आहेत. बिहारच्या पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सीतामढी, शिवहर, सुपौल, किशनगंज, दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपाळगंज आणि खगेरिया यांचा समावेश आहे. बागमती, बुधी गंडक, कमलाबलान, लालबाकैया, अध्वारा, खिरोई, महानंदा आणि घाघरा नद्या धोक्याच्या पातळीच्या वरुन वाहत आहेत.
पूर्व बिहारमधील चंपारणमध्ये एनडीआरएफचे सैनिक लोकांसाठी देवदूत बनून आले आहेत. पूर्व चंपारण जिल्ह्यात पाण्यामध्ये अडकलेले लोकं नावेतून नदी पार करीत होते. परंतु जेव्हा त्यांची बोट नदीत अडकली, तेव्हा एनडीआरएफच्या पथकाने ही बोट खेचून किनाऱ्यावर टाकली.
कटरा ब्लॉकमधील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत चढ-उतारांमुळे पूरग्रस्तांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. याशिवाय बुधी गंडकातील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने किनारपट्टी मोहल्ल्यांमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाणी वेगाने वाढत असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
ब्रह्मपूत्र नदीला पुरामुळे आतापर्यंत 95 लोकांचे प्राण गेले आहेत. आसामच्या नागावमध्ये आलेल्या पुरामुळे बर्यापैकी नुकसान झाले आहे. आसाममधील 26 जिल्हे पूरस्थितीत आहेत. अडीच हजार खेड्यांमधील सुमारे 28 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. राज्यात पुरामुळे आतापर्यंत 95 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 50 हजार लोकांना मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे काबरी जलविद्युत प्रकल्प धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर नागाव जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.