गुवाहटी : आसाममध्ये धो धो पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाने थांबण्याचे नाव घेतले नसल्याने येथे पुराचा मोठा धोका वाढला आहे. पुराने थैमान घातल्याने तब्बल ४.५ हजार लोकांना या फटका बसला आहे. तर राज्यातील १७ जिल्ह्यांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमधील नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. अनेक गावांत घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आसाममधील गोलाघाट, धेमाजी आणि कामरुपमध्ये तीन जणांचा पावसाने बळी घेतला आहे. तिघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.  लखीमपूर, बिस्वानाथ, दरँग, बारपेटा, नलबारी, चिरांग, गोलाघाट, मजूली, जोरहाट, दिबरूगड, नागाव, मोरीगाव, कोक्राझार, बोंगाईगाव, बकसा आणि सोनीतपूर या गावांना जोरदार तडाखा बसला आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 



राज्यात बारपेटा जिल्ह्याला पुराच्या पाण्याचा मोठा  फटका बसला आहे. जिल्ह्यात ८२ हजार  २६२ लोक बाधित झाली आहेत. धेमजीमध्येही अशीच परिस्थिती आहे. येथे ८० हजार २१९ लोक प्रभावित झाले आहेत. त्यामुळे येथील लोकांचा राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.


आसाममधील मुसळधार पावसामुळे आतापर्यंत जवळपास अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. जवळपास दोन हजार लोकांची छावण्यांमध्ये सोय करण्यात आली आहे. मात्र, ही व्यवस्था अपुरी पडत आहे. काझीरंगा राष्ट्रीय पार्कमध्येही पाणी घुसल्याने प्राण्यांची अवस्था बिकट झाली आहे.