राजस्थानातील सत्ता संघर्ष, २-३ दिवसात होऊ शकते फ्लोर टेस्ट
राजस्थानमध्ये सत्तेसाठीचा संघर्ष हा एक रोचक वळणावर
जयपूर : राजस्थानमध्ये सत्तेसाठीचा संघर्ष हा एक रोचक वळणावर आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयही वेगाने बदलणार्या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय झाले आहे. गृहमंत्रालयाने राजस्थानच्या मुख्य सचिवांना फोन टॅपिंग प्रकरणी अहवाल देण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेऊन बहुमताचा दावा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार बुधवारी किंवा गुरुवारी विधानसभेचे अधिवेशन बोलवू शकते आणि यावेळी फ्लोर टेस्ट होऊ शकते.
राजस्थानच्या राजकारणात आता मुगले-आझम, अनारकली आणि लगान दाखल झाले आहेत. जयपूरमधील हॉटेल फेअरमाउंट येथे गेहलोट कॅम्पच्या आमदारांना ‘मुगले आजम’ हा चित्रपट दाखवला. त्यानंतर लगान हा चित्रपट दाखविण्यात आला. इतकेच नाही तर महिला आमदारांनी हॉटेलच्या स्वयंपाकघरातल्या आचारीकडून स्वयंपाकाचे धडे ही घेतले. हॉटेलमध्ये असं चित्र आहे, पण राजस्थानमध्ये अजूनही सत्तेच्या युद्धाचे चित्र आहे. केंद्रीय गृह मंत्रालय घोडे बाजाराच्या संबंधित कथित फोन टॅपिंग प्रकरणात सक्रिय झाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राजस्थानच्या फोन टॅपिंग प्रकरणात केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांकडे अहवाल मागविला आहे. मुख्य सचिव राजीव यांचे म्हणणे आहे की, त्यांना फोन टॅपिंगची माहिती नाही. फोन टॅप करण्याबाबत त्यांच्याकडे कोणतीही तक्रार नाही. काल दिल्लीत झालेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेत भाजपने फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. भाजपच्या प्रश्नावर काँग्रेसने पलटवार केला आणि आरोप केला की भाजपने आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न मान्य केला आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गेहलोत यांनी राज्यपालांना सांगितले आहे की त्यांना आमदारांचा पाठिंबा आहे आणि सरकार पूर्णपणे स्थिर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभेचे अधिवेशन बुधवार-गुरूवारी बोलावले जाऊ शकते. या सत्रात फ्लोर टेस्टदेखील होऊ शकते.
हरियाणाच्या मानेसरमधील आयटीसी भारत हॉटेलमध्येही खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया आणि राजेंद्र राठोड यांनी बंडखोर आमदारांशी २ तास चर्चा केली आहे. दरम्यान, अशोक गेहलोत यांचे जवळचे सहकारी राजीव अरोरा, सुनील कोठारी आणि रतनकांत शर्मा यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाच्या छापेमारीत 12 कोटींची रोकड सापडली आहे. 1 कोटी 70 लाखांचे दागिनेही सापडले आहेत.