ठरलं! भारतात `या` तारखेपासून दिसेल उडणारी कार! भाडे किती असेल? जाणून घ्या
Flying Car: फ्लाइंग टॅक्सी सुरक्षेची व्यवस्था कशी असेल? ओला, उबरच्या तुलनेत याचे भाडे किती असेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, सत्य चक्रवर्ती यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
Flying Car: तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे चाललंय. जगभरातील तांत्रिक प्रगतीचा वेग पाहता अशक्य असे काहीही वाटत नाही. भारतात मोनो, मेट्रो धावू लागल्या आहेत. पण वाढत्या लोकसंख्येसोबत वाहतुकीची यंत्रणाही अपग्रेड केली जाणार आहे. लवकरच फ्लाईंग कार/टॅक्सी भारतीयांच्या सेवेत दाखल होईल. भारतातील पहिली फ्लाइंग टॅक्सी - E200 घडवताना आलेल्या अनुभवाबद्दल ePlane कंपनीचे संस्थापक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासमधील एरोस्पेस इंजिनीअरिंग प्राध्यापक सत्य चक्रवर्ती यांनी सांगितले आहे. दरम्यान यामध्ये सुरक्षेची व्यवस्था कशी असेल? ओला, उबरच्या तुलनेत याचे भाडे किती असेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, सत्य चक्रवर्ती यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
e200 ची रचना, सुरक्षितता आणि त्याचा शहरी वाहतुकीवर होणारा संभाव्य परिणाम याच्या विविध पैलूंबद्दल त्यांनी माहिती दिली. गजबजलेल्या आकाशात उडू शकू आणि ते भारतातील घट्ट ठिकाणी उतरवू शकू, यासाठी आम्हाला ई-प्लेन अतिशय कॉम्पॅक्ट बनवायचे होते, असे त्यांनी सांगितले. एकदा बॅटरी चार्ज झाली की त्यात अनेक छोट्या ट्रिप करता येतील, असेही त्यांनी सांगितले.
कधी घेणार उड्डाण?
फ्लाइंग टॅक्सीबद्दल खूप माहिती भारतीयांनी गोळा केली. याबद्दल प्रत्येकाच्या मनात आकर्षण आहे. पण ही भारतात प्रत्यक्षात कधी येणार याबद्दल उत्सुकता आहे. तर फ्लाइंट टॅक्सी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पहिले उड्डाण घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठरल्याप्रमाणे सर्वकाही झाले तर भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. फ्लाइंग टॅक्सीसाठी भारतात अनेक कठीण अडथळे येत आहेत. असे असले तरी ePlane ने सबस्केल प्रोटोटाइप, e50 चे यशस्वी उड्डाण चाचणी केली आहे..
सुरक्षेसाठी काय?
प्रवाशांची सुरक्षितता करणे ही या ई-प्लेनमधील सर्वात महत्त्वाची बाब असल्याचे प्रोफेसर चक्रवर्ती यांनी सांगितले. संभाव्य धोके कमी करण्यासाठी डिझाइन केलेल्या बहु-आयामी सुरक्षा धोरणाबद्दल त्यांनी माहिती दिली. आंतरराष्ट्रीय मानकांचे कठोर पालन करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपत्कालीन परिस्थितीत सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी पॅराशूट आणि इन्फ्लाटेबल्स सारखे आपत्कालीन उपाय केले जातील. यासोबतच उड्डाणादरम्यान स्थिरता आणि नियंत्रण वाढवण्यासाठी उभ्या रोटर्स आणि एरोडायनामिक डिझाइनसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असेही ते म्हणाले.
भाडे किती?
उड्डाण करणाऱ्या टॅक्सींची ही कल्पना खूप आकर्षक वाटत असली तरी हा प्रवास सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारा ठरु शकतो. असे असले तरी यामुळे मिळणाऱ्या सुलभतेमुळे लोकांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे ई-प्लेन टॅक्सींकडे लोकांच्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनू शकते, असे त्यांनी सांगितले. उबेर सारख्या पारंपारिक राइड-हेलिंग सेवेच्या तुलनेत फ्लाइंग टॅक्सीचे भाडे दुप्पट असेल. तसेच त्याची सेवादेखील त्याच प्रकारची असेल. यामुळे प्रवासाचा खूप वेळ वाचेल, असेही ते पुढे म्हणाले.