प्रसिद्ध फूड ब्लॉगर आणि शेफ नताशा दिड्डीचं निधन झालं आहे. कॅन्सर झाल्यामुळे डॉक्टरांनी सर्जरी करत तिचं संपूर्ण पोट काढून टाकलं होतं. तिच्या पोटात ट्यूमर सापडला होता. इंस्टाग्रामवर 'द गटलेस फूडी' नावाने ती प्रसिद्ध होती. विशेष म्हणजे ती व्यवसायाने शेफ होती, पण अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी तिच्याकडे पोट नव्हतं. ती डंपिंग सिंड्रॉमचा सामना करत होती. अखेर आयुष्याशी सुरु असणारी तिची झुंज संपली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेवणाची इतकी आवड असतानाही नताशा मात्र हवं ते खाऊ शकत नव्हती. तिच्या प्रत्येक घासावर डॉक्टरांची नजर होती. पण या स्थितीतही नताशा दिवस-रात्र चांगले पदार्थ बनवायची आणि इतर सर्वांना खाऊ घालायची. तिच्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे. 


2019 मध्ये नताशा दिड्डीला कॅन्सरचं निदान झालं होतं. तिच्या पोटात अनेक ट्यूमर विकसित झाले होते. खाल्लेलं अन्न पचत नसल्याने तिच्या जेवणावर अनेक बंधनं होती. कॅन्सर शरिरात पसरु नये यासाठी डॉक्टरांनी तिचं संपूर्ण पोट काढून टाकलं होतं. 


नताशाच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण तिच्या पतीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत निधनाची माहिती दिली आहे. यानुसार 24 मार्चला नताशाने अखेरचा श्वास घेतला. पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की, "अत्यंत दु:खाने आणि वेदनेने मला कळवावं लागत आहे की, माझी पत्नी नताशा उर्फ ​​द गुटलेस फूडी हिचे निधन झालं आहे". नताशाचे इंस्टाग्राम अकाऊंट @thegutlessfoodie सुरु ठेवलं जाईल, कारण मला माहित आहे की तिच्या पोस्ट आणि स्टोरी अनेकांना प्रेरित करतात असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. नताशा फूड वेबसाइट आणि इंस्टाग्राम चालवत होत्या. त्या काही हॉटेल्समध्ये सल्लागार म्हणूनही काम करत होत्या.


नताशाने 'फोरसम' नावाचे एक पुस्तकही लिहिलं होतं. पोट नसतानाही ती आपले आयुष्य भरभरून जगत होती. भारतीय पाककृती जगातील पाककृतींपेक्षा चांगली आहे कारण त्यात खूप विविधता आहे असं तिचं म्हणणं होतं तसंच 'हेल्दी इटिंग'शी संबंधित अनेक गैरसमजही दूर करण्याचा तिचा प्रयत्न होता. मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकाने स्वयंपाक शिकला पाहिजे आणि आता पिझ्झा आणि बर्गर सोडून रोटी-भाज्यांकडे जावं असा सल्ला तिने दिला होता.


पुण्यात राहणाऱ्या नताशाने मुंबईच्या दादर कॅटरिंग कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं. तिला लहानपणासून स्वयंपाकाची आवड होती. तिने मुंबईच्या अनेक मोठ्या रेस्तराँ, हॉटेलांमध्ये काम केलं. लग्नानंतर ती दिल्लीला शिफ्ट झाली. तिथे नोकरी करताना तिला वेगवेगळ्या शेफ्सना भेटण्याची तसंच खाद्यसंस्कृती समजून घेण्याची संधी मिळाली.  33 वर्षांची असताना तिला पोटातील ट्यूमर्सची माहिती मिळाली. 9 तासांच्या सर्जरीनंतर तिचं पोट काढून टाकण्यात आलं होतं.