अन्नधान्याच्या दरात प्रचंड वाढ; महागाईचा सहा वर्षातील उच्चांक
या निर्देशंकाने डिसेंबर २०१३ नंतर पहिल्यांदाच दोन आकडी संख्या गाठली आहे.
नवी दिल्ली: देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) घटल्यामुळे निर्माण झालेल्या चिंतेत आता आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील मरगळ ही मोजक्या क्षेत्रांपुरताच मर्यादित नसून सर्वत्र त्याचा परिणाम पाहायला मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सगळ्यामुळे महागाईत प्रचंड भर पडली आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक १०.०१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. या निर्देशंकाने डिसेंबर २०१३ नंतर पहिल्यांदाच दोन आकडी संख्या गाठली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये ग्राहक खाद्यान्न किंमत निर्देशांक (CFPI) झपाट्याने वाढला आहे. ऑगस्ट महिन्यात CFPI अवघा २.९९ टक्के इतका होता. यानंतर सप्टेंबरमध्ये तो ५.११ टक्के, ऑक्टोबरमध्ये ७.८९ टक्के आणि आता हा निर्देशांक थेट १०.१ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. एरवी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे या निर्देशंकात भर पडते. मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे ही परिस्थिती ओढावली आहे.
याशिवाय, नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर साडेपाच टक्क्यांपेक्षा अधिक नोंदवण्यात आला आहे. किरकोळ महागाईच्या दराने ५.५४ टक्क्यांचा स्तर गाठला. गेल्या ३ वर्षांहून अधिक कालावधीतील ही सर्वोच्च किरकोळ महागाई ठरली आहे. नोव्हेंबरमध्ये फळभाज्यांच्या किमतीत ३६ टक्क्यांनी वाढ झाली. देशभरात गाजलेल्या कांद्याच्या भाववाढीचे प्रमाण याहून अधिक होते. डाळींच्या किमतीत सुमारे १४ टक्क्यांनी, मासे व मटणाच्या किमतीत ९.३८ टक्क्यांनी तर, कडधान्ये व अंड्यांच्या किमतीत ३.७१ टक्क्यांनी वाढ झाली. यापूर्वी जुलै २०१६मध्ये किरकोळ महागाईचा निर्देशांक ६.०७ टक्क्यांवर पोहोचला होता.