श्रीनगर : भारतीय सैन्याच्या इतिहासात पहिल्यांदात लाईन ऑफ कंट्रोल अर्थात (LoC) म्हणजेच नियंत्रण रेषेपाशी  'rifle women' तैनात करण्यात आल्या आहेत. जम्मू- काश्मीर भागात असणाऱ्या भारत- पाकिस्तान नियंत्रण रेषेपाशी सैन्याच्या सेवेत असणाऱ्या या सशस्त्र महिला देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लष्कराच्या जवानांसमवेत त्यांच्या बरोबरीनं महिलांनी शस्त्रसज्ज होत देशाच्या संरक्षणार्थ थेट नियंत्रण रेषा गाठण्याची ही लष्कराच्या इतिहासातील पहिलीच वेळ. भारतीय लष्कराच्या सेवेत असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली जवळपास नऊ सशस्त्र महिला जवानांची म्हणजेच  'rifle women'ची तुकडी नियंत्रण रेषा भागातील साधना टॉप या भागात तैनात करण्यात आली आहे. समुद्रसपाटीपासून दहा हजार फुटांच्या उंचीवर असणाऱ्या या भागातून थेट नियंत्रण रेषेकडे जाणाऱ्या मार्गाच्या संरक्षणाची जबाबदारी या  'rifle women'वर असणार आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार या  'rifle women' आसाम रायफलच्या तुकडीतील आहेत. जी निमलष्करी दलातील एक अतीव महत्त्वाची तुकडी आहे. देशाच्या नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या सीमाभागाच्या संरक्षणात या तुकडीची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. 


 'rifle women'वर अंमली पदार्थ, बनावट चलन, शस्त्र यांच्या तस्करी आणि साधना पास भागात होणाऱ्या कोणत्याची चुकीच्या हालचालींवर नजर ठेवण्याचीही मोठी जबाबदारी असणार आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या अतीशय नजीक असणाऱ्या या भागातून पाकिस्तानकडून दहशतवाद्यांची घुसखोरीही सुरु असल्याच्या घटना आजवर घडल्या आहेत, त्यामुळं या  'rifle women'वर ही आणखी एक जबाबदारी असेल. 



 'rifle women'ना तैनात करण्याच्या निर्णयाकडे एक मोठा निर्णय़ म्हणून पाहिलं जात आहे. कारण, तंगधार आणि तिथवल या नियंत्रण रेषेजवळील भागांतील जवळपास ४० गावांतून काश्मीरच्या दिशेनं बरीच वाहतूक होते. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा भाग समजला जात आहे. अनेकदा या भागांतून महिलांच्या मदतीनंही घुसखोरीच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये जवानांना काही अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण, आता मात्र  'rifle women'मुळं भारतीय लष्करातील जवानांना या भागावर करडी नजर ठेवण्यात मोलाचं सहकार्य लाभणार आहे.