माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन शेषन यांचे निधन; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
अनेक नेत्यांनी टीएन शेषन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
चेन्नई : माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन शेषन यांचे रविवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डिक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. टीएन शेषन यांनी भारतातील निवडणूक आयोगासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, सुप्रिया सुळेंसह अनेक नेत्यांनी टीएन शेषन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
टी.एन शेषन यांनी डिसेंबर १९९० ते डिसेंबर १९९६ पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलं होतं. ते भारताचे १०वे निवडणूक आयुक्त होते. आपल्या कार्यकाळात शेषन यांनी स्वच्छ व निष्पक्ष निवडणुका घेण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. त्यांच्या कठोर शिस्तीमुळे अनेकदा त्यांचा सरकार आणि अनेक नेत्यांशी वाद झाला.
शेषन यांनी केलेल्या उत्तम कामगिरीसाठी त्यांना १९९६ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
१९९० मध्ये टी.एन. शेषन मुख्य निवडणूक आयुक्त होईपर्यंत, सामान्य माणूस निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल अनभिज्ञ होता, पण शेषन यांनी ते जनतेच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या. निवडणूक प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शी बनविण्यासाठी, त्याचे रुप बदलण्याची आवश्यकता त्यांना जाणवली आणि त्यांनी यात सुधारणा देखील केल्या.
टी.एन शेषन यांना त्यांची शेवटची काही वर्ष वृद्धाश्रमात घालवावी लागली. ते पत्नीसोबत चेन्नईतील वृद्धाश्रमात राहत होते. त्यांच्या पत्नीचे २०१८ मध्ये निधन झाले. त्यांना विसरण्याचा आजार होता. शेषन सत्य साई बाबा यांचे भक्त होते. त्यांच्या मृत्यूनंतर शेषन यांना मोठा धक्का बसला होता. त्यांना वृद्धाश्रमात भरती करण्यात आले होते. तीन वर्षांपर्यंत तेथे राहिल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या घरी नेण्यात आले होते. मात्र, काही दिवस घरी राहिल्यानंतर त्यांना पुन्हा वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले.