नवी दिल्ली : जम्मू -काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचे पडसाद सध्या साऱ्या जगातून उमटताना दिसत आहेत. सीआरपीएफच्या ४० जवानांना या हल्ल्यात हौतात्म्य आलं. भारतासह इतरही विविध राष्ट्रांकडून पाकिस्तानने दहशतवादी संघटानांना पाठिंबा देऊ नये अशी ताकिदही देण्यात आली आहे. पण, मुळात जैश-ए-मोहम्मद या संघटनेकडून जरी पुलवामा हल्ला घडवण्यात आला असला तरीही यात पाकिस्तानचा काहीच हात नाही, असंच मत पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी मांडलं आहे. 'अतिशय भयावह' असा पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधत त्यांनी पुलवामा हल्ल्याविषयी आपली आणि पाकिस्तानची भूमिका स्पष्ट केली. 'हे सारं अतिशय भयावह आहे. मी याचा निषेध करतो. इथे कोणत्याही प्रकारच्या सहानुभूतीचा विषयच येत नाही. कारण, माझ्यावरही जैश...चा हल्ला झाला होता. मला नाही वाटत खुद्द इम्रान खानही त्यांच्या (जैशच्या) बाजूने असतील', असं ते म्हणाले. 


पाकिस्तानचा या हल्ल्याशी काहीच संबंध नाही, ही बाब त्यांनी तितक्याच ठामपणे मांडली. 'तो हल्ला मौलाना आणि जैशने केला आहे. पण, त्यामुळे पाकिस्तान सरकारला दोष देता कामा नये. या प्रकरणात संयुक्तरित्या चौकशी आणि तपासणी व्हावी आणि जर खरंच (पाकिस्तान) सरकारचा यात हात असेल, तर मग हे दु:खदायक आहे', हा मुद्दा त्यांनी मांडला. 


सध्याच्या घडीला आपला देश अर्थात पाकिस्तान ज्या अडचणींचा सामना करत आहे, हे पाहता कोणत्याही वादाच्या परिस्थितीत सापडण्याची वेळ ते ओढावणार नाहीत असं म्हणत मुशर्रफ यांनी पाकिस्तानच्या आर्थिक संकटाकडे लक्ष वेधलं. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर बंदी आणण्याची मागणीही त्यांनी केली.