मुंबई : साऱ्या देशाला शोकसागरात टाकणारी एक घटना मंगळवारी घडली. माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं निधन झालं. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती देण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी सायंकाळपर्यंत स्वराज यांची प्रकृती  उत्तम होती. किंबहुना देशातील घडामोडी आणि अनुच्छेद ३७० प्रकरणांवरही त्या लक्ष ठेवून होत्या. पण, नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. स्वराज या त्यांच्या कारकिर्दीसोबत आपल्यात आहेतच. जीवनात अखेरच्या क्षणापर्यंत त्या आपल्या कामाशी आणि देशसेवेशी किती प्रामाणिक होत्या याचाच प्रत्यय येत आहे. कारण, माध्यमांमध्ये चर्चा सुरु आहे ती म्हणजे त्यांच्या एका फोन कॉलची. बहुधा तो अखेरचा फोन कॉल असावा असंही म्हटलं जात आहे. जो कायम सर्वांच्या स्मरणात राहणार आहे. 


आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचं प्रतिनिधित्व करत पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचा खटला लढणाऱ्या वकील हरीश साळवे यांच्याशी त्यांनी निधनाच्या काही तासांपूर्वीच संपर्क साधला होता. जाधव यांचा खटला लढणाऱ्या साळवे यांनी अवघ्या एक रुपयाच्या मानधनावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात हा महत्त्वाचा खटला लढला आहे, त्याची फी (मानधन) घेऊन जाण्याचं स्वराज यांनी त्यांना सांगितलं होतं. 



स्वराज यांच्या निधनाची माहिती मिळताच, साळवे यांनी माध्यमांशी संपर्क साधताना याविषयीची माहिती दिली. 'मंगळवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास आमचं संभाषण झालं होतं. मी त्यांची भेट घ्यावी, असं त्या म्हणाल्या होत्या. त्या मला जाधव (कुलभूषण जाधव) यांच्या खटल्यासाठीची एक रुपयाची फी (मानधन) देऊ इच्छित होत्या. मी सुद्धा ही अतिशय मौल्यमान अशी फी, मानधन घेण्यासाठी नक्कीच येईन असं त्यांना सांगितलं', असं साळवे म्हणाले. 'उद्या तुमची फी घेऊन जा', असं मोठ्या आपुलकीने सांगणाऱ्या  स्वराज यांच्या निधनामुळे आपण थोरली बहीण गमावल्याची भावना व्यक्त करत त्यांनी स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.