वाराणसी : आजकाल फॅशनचे अनेक ट्रेंड फॉलो केले जातात. अशातच तरूणांमध्ये एक ट्रेंड दिसून येतो तो म्हणजे टॅटू काढण्याचा. कदाचित तुम्हीही टॅटू काढण्याचा विचार करत असाल, यासाठी तुम्ही डिझाईन देखील शोधली असेल. पण थांबा...ही बातमी वाचून कदाचित तुमचा टॅटू काढण्याचा विचार पूर्णपणे डोक्यातून काढून टाकाल. कारण टॅटू काढण्यासाठी वापरल्या गेलेल्या सुईमुळे काहींना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, टॅटू काढणाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांचं आयुष्य आता पणाला लागणं आहे. टॅटू काढणाऱ्यांनी एकाच सुईचा सतत वापर केल्यामुळे उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एचआव्हीची लागण झाल्याची माहिती आहे. यामुळे युपीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


याठिकाणी अचानक 14 जणांना ताप आला आणि ते आजारी पडले. यावेळी या सर्वांची मलेरिया आणि टायफॉईड यांची चाचणीही करण्यात आली. मात्र यामधून काहीही समोर आलं नाही. मात्र ताप काही कमी होण्याचं नाव घेईना. अखेरीस यांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. यामधून त्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचं समोर आलं.


मुख्य म्हणजे, ज्यावेळी या सर्वांची विचारपूस केली असता, त्यांनी कोणतेही असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले नसल्याचं समोर आलंय.