Tamilnadu Crane Collapse Viral Video: तामिळनाडूमध्ये क्रेन कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला असून, पाचजण जखमी झाले आहेत. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. मंदिर उत्सवादरम्यान ही धक्कादायक घटना घडली असून कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रेनवर आठ लोक हार स्वीकारण्यासाठी बसलेले असताना ही दुर्घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रौपदी अम्मन उत्सव साजरा केला जात असताना क्रेनवर देवी-देवतांच्या मूर्ती होत्या. रात्री 8.15 दरम्यान ही दुर्घटना घडली. पोंगलनंतर हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. 



दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत लोक क्रेनला लटकलेले दिसत आहेत. क्रेनची हालचाल सुरु असताना अचानक ती अनियंत्रित होते आणि खाली कोसळते. यावेळी लोकांची गर्दी होती. क्रेन कोसळताना पाहून एकच धावपळ सुरु होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 




"क्रेन थोडी उंचावर होती. अनियंत्रित झाल्याने क्रेन खाली कोसळली. याप्रकरणी तपास सुरु आहे," अशी माहिती राणीपेठच्या पोलीस अधिक्षक दीपा सत्यन यांनी दिली आहे. क्रेन ऑपरेटरला ताब्यात घेतलं असल्याची माहिती राणीपेठचे जिल्हाधिकारी भास्कर पंडियन यांनी दिली आहे. क्रेन वापरण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती किंवा तशी पूर्वकल्पनाही देण्यात आली नव्हती असं त्यांनी सांगितलं आहे.