काँग्रेसची मोठी घोषणा, सरकार आल्यानंतर कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास
Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. दरम्यान, कर्नाटकात सत्ताबद्दल निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
Karnataka Election 2023 : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राच्या धर्तीवर महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. याठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच खरी लढत पाहायला मिळणार आहे, असे सध्या चित्र दिसून येत आहे. दरम्यान, कर्नाटकात सत्ताबद्दल निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. (Karnataka Assembly Elections 2023 Updates)
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे 2023 रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निवडणूक निकाल लागणार आहे. काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी राज्यातील सार्वजनिक वाहतूक बसमध्ये महिलांना मोफत प्रवास सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यावेळी ही मोठी घोषणा केली.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचा जाहीरनामा हा आरएसएसचा असेल. जे ते ठरवतील तेच त्यांच्या जाहीरमान्यात असेल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी म्हणाले, आमच्या चार जाहीर आश्वासनांमध्ये आणखी एका आश्वासनाची भर घालत आहे. यानुसार काँग्रेस सत्तेवर येताच पहिल्याच दिवशी पाचवे आश्वासन पूर्ण केले जाईल, ज्याअंतर्गत संपूर्ण कर्नाटकात महिलांना सार्वजनिक वाहतूक बसमधून मोफत प्रवास करता येईल.
राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना भाजपच्या लोकांनी 40 टक्के कमिशनच्या माध्यमातून कर्नाटकातील महिलांचा पैसा लुटला आहे. ते त्यांच काम आहे. मात्र, आमचे सरकार आल्यानंतर राज्याच्या पैशाचा फायदा कर्नाटकातील महिलांना देण्यात येईल. त्यामुळे काँग्रेसने ही निवडणूक जिंकल्यानंतर बस प्रवासासाठी महिलांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही.
काँग्रेसने मतदारांना काय दिले आश्वासन
काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात काही गोष्टी मोफत देण्याचे म्हटले आहे. 'गृहज्योती' योजनेंतर्गत दरमहा 200 युनिट मोफत वीज, 'गृहलक्ष्मी' योजनेंतर्गत कुटुंबातील प्रत्येक महिला प्रमुखाला दरमहा 2,000 रुपये, तसेच 'अण्णा भाग्य' या अंतर्गत बीपीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा 10 किलो तांदूळ देण्यात येणार आहे. याशिवाय युवानिधी अंतर्गत बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3,000 रुपये तर डिप्लोमा धारकांना 1500 रुपये दरमान दोन वर्षांसाठी देण्यात येणार आहेत.
भाजपला नाराजीचा फटका?
कर्नाटकात भाजपची सत्ता आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसलण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजपने कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या कामगिरीबाबत मोठे दावे केले असले तर, अनेक मतदानपूर्व सर्वेक्षणानुसार त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता दर्शविली आहे. याचा फायदा हा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. तसेच भाजपमध्ये उमेदवारीवरुन तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे. याचाही फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.