नवी दिल्ली: अलीगड मुस्लिम युनिवर्सिटीमध्ये असलेल्या पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांच्या चित्रावरून वाद निर्माण झालेल्या वादात आता हिंदू महासभेनेही उडी घेतली आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी युनिवर्सिटीतील जिनांचे चित्र काढून टाकावे तसेच, योगींनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी स्वामी प्रसाद मौर्य यांनाही मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. योगींनी हे निर्णय घ्यावेतच. त्यांनी जर हे दोन निर्णय घेतले नाहीत, त्यांना ते जमत नसेल तर, त्यांनी स्वत:च राजीनामा द्यावा, अशीही मागणी स्वामी चक्रपाणी यांनी केली आहे.


केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंहांना दिले निवेदन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनी मोहम्मद अली जिना हे महापुरूष होते. तसेच फाळणीपुर्वी या देशात जिनांनीही आपले मोठे योगदान दिल्याचे उद्गार काढले होते. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमिवर स्वामी चक्रपाणी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशीही चर्चा करून त्यांना एक निवेदनही दिले आहे.


'मौर्य यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरा'


राजनाथ सिंह यांना दिलेल्या आपल्या नवेदनात चक्रपाणी यांनी अली जिना यांना महापुरूष म्हटल्याबद्दल आक्षेप घेतला आहे. मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या या विधानबद्दल त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करावा असेही चक्रपाणी यांनी आपल्या निवेदानात म्हटले आहे. तसेच, जिनांबद्धल उद्गार काढून मौर्य यांनी स्वत:ला राष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नससल्याचेही चक्रपाणी यांनी म्हटले आहे.