२५ वर्षांपूर्वी मोदींसोबत गेले होते अमेरिकेला, आज होणार मंत्री
पंतप्रधान मोदींचे जुने सहकारी आज मंत्री होणार.
नवी दिल्ली : देशात दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदी सत्तेत आले आहेत. आज राष्ट्रपती भवन परिसरात त्यांचा शपथविधी सोहळा रंगणार आहे. यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला मंत्रीपद मिळणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. अनेक नावं चर्चेत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि सिकंदराबाद येथून खासदार असलेले जी. किशन रेड्डी यांना देखील पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. जी. किशन रेड्डी यांना देखील पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्याचं कळतं आहे.
तेलंगणामध्ये पहिल्यांदा भाजपने चार जागा जिंकल्या आहेत. या चार जागां जिंकण्यामागचं श्रेय हे रेड्डी यांना जातं. त्यामुळे त्यांनी मंत्रीपद मिळू शकतं. तेलंगणामधून एका सर्वसामान्य घरातील असलेले जी. किशन रेड्डी हे पंतप्रधान मोदींचे जवळचे मानले जातात. रेड्डी हे काही जुन्या फोटोंमध्ये देखील पंतप्रधान मोदींसोबत दिसत आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते 1994 ला अमेरिकेला गेले होते. जी. किशन रेड्डी याचा राजकीय प्रवास हा संघापासून सुरु झाला. 1977 मध्ये त्यांनी जनता पक्षात कार्यकर्ते म्हणून सहभाग घेतला.
2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा हिमायत नगर येथून निवडणूक लढवली. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. 2009 आणि 2014 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. ते अम्बरपेट मतदारसंघातून निवडून आले.
तीन वेळा ते संयुक्त आंध्र प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष होते. नंतर ते तेलंगणामध्ये यूनिट चीफ होते. जी. किशन रेड्डी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. मोदी संघात असताना त्यांची ओळख रेड्डी यांच्यासोबत झाली.