मोठी बातमी! गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा असदचा पोलिसांकडून एन्काऊंटर
Atiq Ahmed Son Asad Encounter: गँगस्टर आणि राजकारणी अतीक अहमदचा मुलगा असद पोलीस चकमकीत ठार झाला आहे. उमेश पाल हत्या प्रकरणी तो फरार होता. चकमकीत त्याचा साथीदारही मारला गेला आहे.
Atiq Ahmed Son Asad Encounter: गँगस्टर आणि राजकारणी अतीक अहमदचा मुलगा असद याला ठार करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने चकमकीत असद याला ठार केलं आहे. झांशी येथे ही चकमक झाली असून असदसह त्याचा साथीदारही मारला गेला आहे. पोलिसांना घटनास्थळी परदेशी बनावटीची शस्त्रं सापडली आहेत. उमेश पाल हत्याकांड प्रकरणी असद गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतीक अहमदचा मुलगा असद आणि मकसूदन याचा मुलगा गुलाम हे दोघे प्रयागराजमधील उमेश पाल हत्याकांड प्रकरणी फरार होते. पोलिसांनी दोघांवरही प्रत्येकी पाच लाखांचा बक्षीस जाहीर केलं होतं. पोलीस राज्यभरात दोघांचा शोध घेत होते. यादरम्यान झाशी येथे डीएसपी नवेंदू आणि विमल यांच्या नेतृत्वातील उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्ससह झालेल्या चकमकीत दोघे ठार झाले आहेत. पोलिसांना त्यांच्याकडे परदेशी बनावटीची शस्त्रं सापडली आहेत.
एकीकडे उमेश पाल हत्याकांड प्रकरणी अतीक अहमद आणि अशरफ यांना आज कोर्टात हजर केलं जात असतानाच, दुसरीकडे ही चकमक झाली आहे. युपी एसटीएफने अतीक अहमदचा मुलगा असद याच्यासह उमेश पालची दिवसाढवळ्या हत्या करणाऱ्या मोहम्मद गुलाम यालाही ठार केलं आहे.
युपी एसटीएफचे एडीजी अमिताभ यश यांनी सांगितलं की, असद आणि गुलाम यांनी जिवंत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यांनी एसटीएफवर गोळीबार केला. यानंतर त्यांना चकमकीत ठार करण्यात आलं.
असद आणि गुलाम यांनी दिवसाढवळ्या केली उमेश पालची हत्या
24 फेब्रुवारीला प्रयागराज येथे राजूपाल हत्याकांडमधील साक्षीदार उमेश पाल यांची हत्या करण्यात आली होती. उमेश पाल आपल्या घरातून जात असताना रस्त्यावर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यावेळी बॉम्बही फेकण्यात आले होते. या हल्ल्यात उमेश पाल आणि त्याचे दोन सरकारी सुरक्षारक्षकही मारले गेले होते.
उमेश पालच्या पत्नीने याप्रकरणी अतीक, त्याचा भाई अशऱफ यांच्यासह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी हल्लेखोरांचा शोध घेत होती. यामध्ये असद आणु गुलाम यांचाही समावेश होता. याशिवाय अरमान, गुड्डू मुस्लिम आणि साबी यांचा उल्लेख आहे. गेल्या 47 दिवसांपासून असद आणि गुलाम फरार होते. पण अखेर एसटीएफला मोठं यश मिळालं आहे.
तपासात गँगस्टर अतीक अहमदने केलेल्या हट्टामुळेच असदला उमेश पाल हत्याकांडात सहभागी करुन घेतल्याचं आणि त्याच्याकडून गोळी चालवण्यात आल्याचं समोर आलं होतं. शाइस्ताने याप्रकरणी अतीककडे फोन करुन नाराजी जाहीर केली होती. उमेश पाल हत्याकांडानंतर पाचही शूटर फरार झाले होते. असद आणि गुलाम दिल्लीत जाऊन लपले होते.