ओडिसा : ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बहीण गीता मेहता यांनी पद्मश्री पुरस्कार घेण्यास नकार दर्शवला. केंद्रातील मोदी सरकारने आगामी लोकसभा निवडणूकीत राजकीय फायदा व्हावा या उद्देशाने हे पुरस्कार दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांना साहीत्य आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती. शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यावेळेस एकूण 112 पद्म पुरस्कार दिले गेले. यामध्ये 94 जणांना पद्मश्री, 14 जणांना पद्म भूषण आणि 4 जणांना पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कला, साहित्य, सामाजिक सेवा, विज्ञान, इंजीनियरींग, ट्रेड अॅण्ड इंडस्ट्री, चिकित्सा, साहित्य आणि शिक्षण,खेळ, नागरी सेवेत महत्त्वाचे योगदान येणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मला पद्मश्री पुरस्कारासाठी निवडण्यात आले ही माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब आहे. मला हा पुरस्कार नाकारताना खूप दु:ख होतंय. कारण हा पुरस्कार अशावेळी दिला जातोय जेव्हा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. या पुरस्काराची वेळ योग्य नाही आहे. पुरस्कार न घेण्याची घोषणा करणे हे माझ्यासाठी तसेच सरकारसाठी लज्जास्पद आहे. याचे मला नेहमीच दु:ख राहील.', असे गीता मेहता म्हणाल्या. 


नवीन पटनायक यांच्या बहिण गीता मेहता आता अमेरिकन नागरिक आहेत. यावर्षी एकूण 11 विदेशी नागरिकांना हा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती. लोकसभा निवडणूका फारच जवळ आल्या आहेत. निवडणूक आयोग केव्हाही लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर करु शकते. राजकीय पक्षांची जोरदार तयारीही सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा विरुद्ध विरोधक एकवटले आहेत. केंद्रातील भाजपा सरकारही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरले आहे. सर्वेक्षणामध्ये त्रिशंकू अवस्था दर्शवण्यात येत आहे. 


लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला संपूर्ण बहुमत मिळाले नाही तर भाजपा बीजू जनता दल (BJD) चे समर्थन घेण्याचा प्रयत्न करु शकते.  यासाठी ते बीजेडीचे अध्यक्ष नवीन पटनायक यांची बहिण गीता मेहता यांना पद्मश्री पुरस्कार देऊ इच्छित होते असे म्हटले जात आहे. ओडिसामध्ये बीजेडीचे प्रदर्शन चांगले आहे. त्यांच्याकडे लोकसभेच्या 21 जागा आहेत. गीता मेहता यांनी 1979 साली कर्मा कोला, 1989 मध्ये राज, 1993 मध्ये ए रीवर सूत्र, 1997 मध्ये स्नेक्स एंड लैडर्स : ग्लिम्स ऑफ मॉडर्न इंडिया आणि 2006 साली ईस्टर्न गणेशा : फ्रॉम बर्थ टू रिबर्थ ही पुस्तके लिहिली आहेत. याशिवाय त्यांनी 14 डॉक्यूमेंट्रींचे दिग्दर्शनही केले आहे.