भारताच्या नकाशावर श्रीलंका का दाखवला जातो? या मागचं कारण मनोरंजक
पाकिस्तान, चीन, बांगलादेश किंवा म्यानमार नाही तर श्रीलंकाच का नकाशावर दिसतो?
मुंबई : आपण भारताचा नकाशा बऱ्याचदा पाहिला आहे. शाळेत आपण भारताच्या नकाशाचा खोलवर अभ्यास केला आहे. तेव्हा तुम्ही हे नक्कीच पाहिलं असेल की, भारताच्या नकाशावर आपण श्रीलंका देखील पाहिलं आहे. मग तुम्ही असं विचार केलाय का? की असं का असतं? काही लोकांचं असं मत असेल की, ते आपल्या देशाच्या जवळ आहे म्हणून. परंतु तसं जर असतं तर मग आपल्या भारताच्या जवळ पाकिस्तान, चीन, बांगलादेश किंवा म्यानमार किंवा कोणत्याही शेजारी देशाचा नकाशा का नाही दाखवत?
तसेच आपण जर इतिहास पाहिलं तर श्रीलंका कधीही भारताचा भाग राहिलेला नाही. परंतु पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचे भाग होते, ज्यानंतर ते भारतापासून वेगळे झाले आहेत. मग तरीही श्रीलंकाच का नकाशावर दिसतो?
हे करण्यामागे एक महत्त्वाचा कायदा आहे
भारताच्या नकाशात श्रीलंकेचा नकाशा आहे, याचा अर्थ असा नाही की, श्रीलंकेवर भारताचा अधिकार आहे किंवा नकाशाबाबत दोन्ही देशांमध्ये असा कोणताही करार आहे. उलट यामागे एक अतिशय मनोरंजक कारण आहे.
हे करण्यामागे एक सागरी कायदा आहे. याला महासागर कायदा म्हणतात. हा कायदा संयुक्त राष्ट्रांनी बनवला आहे सन 1956 मध्ये हा कायदा करण्यासाठी युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी (UNCLOS-1) नावाची परिषद आयोजित करण्यात आली होती.
1958 साली संयुक्त राष्ट्र संघाने या परिषदेचा निकाल जाहीर केला. या परिषदेत समुद्राशी संबंधित सीमांबाबत एकमत झाले होते. 1982 पर्यंत तीन परिषदा झाल्या. त्यातून समुद्राशी संबंधित कायद्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली.
200 नॉटिकल मैल अंतर दाखवणे आवश्यक आहे
भारताच्या नकाशात कोणत्याही देशाच्या बेस लाइनपासून 200 नॉटिकल मैलांच्या आत येणारी जागा दाखवणे बंधनकारक असल्याचा निर्णय कायद्यात घेण्यात आला. म्हणजेच, जर एखादा देश समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला असेल, तर अशा स्थितीत त्याच्या सीमेपासून 200 नॉटिकल मैलांच्या दरम्यान येणारे क्षेत्रही त्या देशाच्या नकाशात दाखवले जाईल.
200 नॉटिकल मैल म्हणजे 370 किलोमीटर. त्यामुळे भारताच्या सीमेपासून 370 किलोमीटर अंतरापर्यंतचा भाग नकाशात दाखवण्यात आला आहे. यामुळेच भारताच्या नकाशात श्रीलंकेचा नकाशा समाविष्ट करण्यात आला आहे. भारतातील धनुष्कोडीपासून म्हणजेच भारताच्या शेवटच्या टोकापासून श्रीलंकापर्यंतचे अंतर केवळ 18 नॉटिकल मैल आहे.
त्यामुळे भारताच्या नकाशात श्रीलंकेचे महत्त्वाचे स्थान आहे. तर पाकिस्तान, चीन, बांगलादेश किंवा म्यानमार हे सागरी क्षेत्रांतर्गत येत नाहीत. म्हणून त्यांचा समावेश आपण नकाशात करत नाही.