काश्मीर आणि लडाखमध्ये नायब राज्यपालांची नियुक्ती; सत्यपाल मलिकांकडे गोव्याचा कारभार
सत्यपाल मलिक यांच्या तडकाफडकी बदलीसाठी त्यांचे एक वक्तव्य कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या विभाजनसाठी आठवडाभराचा अवधी शिल्लक असताना शुक्रवारी केंद्र सरकारकडून या दोन्ही स्वतंत्र प्रदेशांसाठी नायब राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली. तर जम्मू-काश्मीरचे विद्यमान राज्यपल सत्यपाल मलिक यांची गोव्याच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.
केंद्र सरकारने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या संमतीने घेतलेल्या निर्णयानुसार गिरीश चंद्र मुरुम हे केंद्रशासित जम्मू-काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल असतील. तर राधाकृष्ण माथूर हे लडाख केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल असतील.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केला होता. यावेळी केंद्राने जम्मू-काश्मीरचे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा निर्णयही घेतला होता.
'उदारमतवादी इंग्रजी माध्यमांनी Article 370 ची योग्य बाजू मांडलीच नाही'
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या तडकाफडकी बदलीसाठी त्यांचे एक वक्तव्य कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. राज्यपालपद हे अत्यंत दुबळे पद आहे. राज्यपदावरील व्यक्तीला साधी पत्रकारपरिषद घेण्याचा किंवा खुलेपणाने बोलण्याचेही स्वातंत्र्य नसते, असे मलिक यांनी म्हटले होते.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती झालेले गिरीश चंद्र मुरूम हे १९८५ च्या गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना गिरीश चंद्र मुरूम हे राज्याचे मुख्य सचिव होते. तर केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या पीएस श्रीधरन पिल्लई यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.