Goa Assembly Election 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Vidhansabha election) भाजपने  (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गोव्यातील माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parikar) यांच्या मुलाला पणजी मतदारसंघासाठी तिकीट देण्यात आलेलं नाही. पणजीतील विद्यमान आमदाराला तिकीट देण्यात आल्याचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर आणि त्यांचे कुटुंब हे आमचे कुटुंब आहे. आम्ही त्याला आणखी 2 पर्याय दिले पण त्याने पहिला पर्याय स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, दुसऱ्या पर्यायावर चर्चा सुरू आहे. ते मान्य करतील असे आम्हाला वाटतं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


उमेदवारांच्या पहिल्या यादीत 34 उमेदवारांची नावे आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांकेलीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर मडगावमधून निवडणूक लढवणार आहेत. गोव्यातील विधानसभेच्या 40 जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.


भाजपाचा आपवर हल्लाबोल 
पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. आप' पक्ष नेहमीप्रमाणे खोटे बोलत आहे. या निवडणुकीत गोव्यात 'आप'ला नाकारले जाईल. आपच्या मोफत वीज देण्याच्या आश्वासनाची लोकांनी खिल्ली उडवली होती. दिल्लीत 'जगमगाती बिजली का नारा' केजरीवाल यांनी दिला होता. प्रत्यक्षात तिथे वारंवार बत्तीगुल होत आहे. गोव्यातही त्यांनी अनेक आश्वासनं दिली आहेत. कोरोनासारख्या आपत्तीत मोहल्ला क्लिनिकचा काही उपयोग नाही. गोवा सरकारची सामाजिक सुरक्षा योजना ही देशातील सर्वात मोठी योजना आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


भाजपकडून ३ एसटी-एससी उमेदवार 
गोवा निवडणुकीसाठी भाजपने 3 जागांसाठी अनुसूचित जमातीचे उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय 1 जागेवर अनुसूचित जातीचा उमेदवार उभा करण्यात आला आहे. भाजपने या यादीत 9 सर्वसाधारण आणि 11 ओबीसी उमेदवार उभे केले आहेत, तर 6 नवीन उमेदवारांचाही या यादीत समावेश आहे.


उत्पल पर्रिकर यांची पहिली प्रतिक्रिया
मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. पण भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचा पत्ता कापण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना उत्पल पर्रिकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी पणजीवरच ठाम आहे, अन्य पर्यायांचा प्रश्नच येत नाही, माझी भूमिका मी लवकरच माध्यमांसमोर मांडेन, असं उत्पल पर्रिकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार का याकडे लक्ष लागलं आहे.