पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे त्यांच्या कार्यक्षम कारभारासाठी ओळखले जातात. यापूर्वी गोव्यात मुख्यमंत्री किंवा केंद्रात संरक्षणमंत्री असताना त्यांच्या साधेपणाचे आणि कार्यक्षमतेचे अनेक किस्से आपण ऐकलेही असतील. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे पर्रिकर यांची मुख्यमंत्री म्हणून आपल्या कामावर किती निष्ठा आहे, याचा प्रत्यय येऊ शकतो. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी रविवारी जुवारी आणि मांडवी उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे पर्रिकर यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. मात्र, या अवस्थेतही पर्रिकर जमेल तसे आपले काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज प्रकल्पाची पाहणी करतेवेळी पर्रिकर यांनी तेथील अधिकाऱ्यांशी बातचीतही केली.



मनोहर पर्रिकर उपचारांसाठी अमेरिकेत गेले असताना गोव्यातील राजकीय परिस्थिती कमालीची अस्थिर झाली होती. अखेर पर्रिकरांनी भारतात आल्यानंतर गोव्याच्या कारभाराची सूत्रे पुन्हा हातात घेतली. मध्यंतरीच्या काळात भाजपने काँग्रेसच्या सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपते या दोन आमदारांना गळाला लावले. त्यामुळे भाजपचे सरकार मजबूत झाले होते. मात्र, यानंतरही काँग्रेसने मुख्यमंत्री घेत असलेल्या प्रत्येक बैठकीचा पुरावा म्हणून व्हीडिओ प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून मुख्यमंत्री कार्यालयाकडून पर्रिकर यांच्या कार्यक्रमाची छायाचित्रे ट्विट केली जात आहेत.