नवी दिल्ली: मनोहर पर्रिकर हेच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील, यावर रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिक्कामोर्तब केले. गेल्या काही महिन्यांपासून पर्रिकर यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. या कारणामुळे त्यांना बहुतांश काळ रुग्णालयामध्ये राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात सत्ताबदल किंवा नेतृत्वबदल होणार असल्याची चर्चा सातत्याने सुरु होती. 


मात्र, अमित शहांच्या आजच्या निर्णयामुळे या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. अमित शहांनी भाजपच्या कोअर कमिटीशी चर्चा करुन हा निर्णय घेतला. यावेळी कोअर कमिटीने पर्रिकर यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केले. यावेळी कोअर कमिटीने लवकरच गोव्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचेही संकेत दिले.