... आणि मनोहर पर्रिकर शेवटच्या श्वासापर्यंत ऑन ड्युटी
नाकात ड्रीप (नळी) असतानाही ते अनेक बैठका आणि कार्यक्रमांना हजेरी लावायचे.
मुंबई: देशातील एक अत्यंत कार्यक्षम आणि स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून ओळखले जाणारे मनोहर पर्रिकर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपले काम निष्ठेने केले. पणजी येथील निवासस्थानी रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. काही महिन्यांपूर्वी मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन उपचार घेतले. मात्र, भारतामध्ये परतल्यानंतर पर्रिकर यांनी तातडीने गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेत येथील अस्थिरता संपुष्टात आणली. प्रकृती साथ देत नसूनही त्यांनी मध्यंतरी जुवारी आणि मांडवी उड्डाणपूलाच्या (अटलसेतू) कामाचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांच्या नाकात ड्रीप (नळी) होती. परंतु, या अवस्थेतही त्यांनी कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांशी बातचीत केली. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पर्रिकरांच्या कामावरील निष्ठेचे कौतुकही केले होते.
गोव्यातील सरकार टिकवण्यासाठी भाजपचे नेते मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीचाही विचार करत नसल्याची टीकाही मध्यंतरी विरोधकांनी केली होती. त्यामुळे पर्रिकरांना विश्रांती घेऊन द्यावी, असे विरोधकांचे म्हणणे होते. मात्र, यानंतरही त्यांनी अटल सेतूच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावून आणि राज्याचा अर्थसंकल्प सादर करून विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. आजारपणाच्या काळात त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन अनेक कामे मार्गी लावली होती. या माध्यमातून त्यांनी गोव्यातील राजकीय आणि प्रशासकीय परिस्थिती कधीच अस्थिर होऊन दिली नाही. दरम्यानच्या काळात त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार पाहायला मिळाले होते. परंतु तरीही पर्रिकर यांनी नेटाने आपले काम सुरु ठेवले होते.
स्वच्छ प्रतिमा आणि साध्या राहणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पर्रिकर यांनी २००० ते २००५, २०१२ ते २०१४ आणि १४ मार्च २०१७ पासून निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोवा राज्याची धुरा सांभाळली. २०१४ ते २०१७ दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रिपद सांभाळले.