एनसीबीची मोठी कारवाई; 10 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या रशियन ड्रग्ज तस्करांना अटक
NCB : गोव्यातील अरामबोल आणि त्याच्या आसपासच्या भागात रशियन ड्रग कार्टेल ड्रग्ज असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. मुंबई एनसीबीच्या पथकाचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
Crime News : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) गोव्यात (Goa) केलेल्या धडक कारवाईत ड्रग्ज (Drug racket) तस्करीचे मोठे रॅकेट उद्धवस्त केले आहे. या कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईत एनसीबीने एका भारतीयासह दोन परदेशी नागरिकांनाही अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रशियन महिलेचा देखील समावेश आहे. या महिलेने 1980 च्या ऑलिम्पिक (Olympic) स्पर्धेत जलतरणात स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. तर अटक करण्यात आलेली दुसरी व्यक्ती परदेशात पोलीस कर्मचारी आहे. आरोपींकडून एनसीबीने कोकेनसह विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
रशियाची ऑलिम्पिक पदक विजेती स्वेतलाना वर्गानोव्हा (59) हिच्यासह आंद्रे नावाचा माजी रशियन पोलीस कर्मचाऱ्याला आकाश नावाच्या भारतीयासह अटक करण्यात आली आहे. हे तिघेही आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेलचा भाग होते. आंद्रे नावाच्या माजी रशियन पोलीस कर्मचाऱ्याची ओळख "रिंगलीडर" म्हणून झाली आहे. हे सर्व मिळून गोव्यात ड्रग्ज रॅकेट चालवत होते अशी माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी दिली.
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या देखरेखीखाली गेल्या दोन आठवड्यांपासून एनसीबीच्या गोवा युनिटने अधिकारी सापळा लावून होते. अखेर शनिवारी एनसीबीने तिघांनाही ताब्यात घेतले. गोव्यातील अरामबोल आणि लगतच्या भागात रशियन कार्टेल ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाळत ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्याने दिली.
"आकाश हा मोठ्या नेटवर्कचा भाग होता आणि तो रशियन व्यक्तीच्या आदेशानुसार काम करत होता. 28 एप्रिलला आकाशला अरंबोल येथे ड्रग्ज आणि काही रोख रकमेसह पकडण्यात आले होते. त्याच दिवशी तिसरा आरोपी आंद्रे याला मांद्रेम परिसरातून काही ड्रग्जसह ताब्यात घेण्यात आले. आंद्रे घरातच ड्रग्जच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे हायड्रोपोनिक रोपटी वाढवत होता. आंद्रे हा बऱ्याच दिवसांपासून गोव्यात हे काम करत होता. वर्गानोव्हा देखील अनेक वर्षांपासून भारतात राहत आहे. ती फक्त परदेशी नागरिकांना अंमली पदार्थ पुरवत होती. तिने घरी हुक्का बार सेटअप देखील केला होता जिथे परदेशी लोक येऊन अंमली पदार्थांचे सेवन कर होते," अशीही माहिती या एनसीबी अधिकाऱ्याने दिली.
आंद्रेकडे आधार कार्डसह बनावट भारतीय कागदपत्रे आढळून आली आहेत. आरोपींकडून एनसीबीने 88 एलएसडी ब्लॉट्स, 8.8 ग्रॅम कोकेन, 242.5 ग्रॅम चरस, 1.440 किलो हायड्रोपोनिक विड, 16.49 ग्रॅम हॅश ऑइल, 410 ग्रॅम हॅश केक, 2 ग्रॅम अमाईन, 8.0 ग्रॅम कॅमेटशहॅम यासह विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले आहेत. यासोबत मोठ्या प्रमाणात परदेशी चलनही आरोपींकडून जप्त करण्यात आले आहे.