सुवर्णपदक विजेत्या मुस्लीम विद्यार्थीनीला पदवीदान सोहळ्यातून बाहेरचा रस्ता
यामागचं कारण...
तिरुवअंतपूरम : पाँडिचेरी विद्यापीठातून मास कम्युनिकेशन विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत, सुवर्ण पदक मिळवणाऱ्या एका विद्यार्थिनीला चक्क पदवीदान सोहळ्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. राबीहा अब्दुरहिम असं त्या विद्यार्थिनीचं नाव. मुख्य म्हणजे या पदवीदान सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती होती, त्यातच तिला बाहेर पाठवल्याची बाब अनेकांना धक्का देत आहे.
मुळच्या केरळमधील कोझिकोडे येथील असणाऱ्या राबीहाने वार्ताहरांना त्या प्रसंगाची माहिती दिली. राष्ट्रपती त्या सोहळ्यात येण्यापूर्वीच तिला त्या सोहळ्यातून बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. CAA सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन आपण आधीच अनेकांच्या नजरेत असल्याची बाब तिने व्यक्त केल्याचंही म्हटलं जात आहे.
'मला नाही ठाऊक त्या ठिकाणहून मला का बाहेर पाठवण्यात आलं', असं म्हणत आपण बांधलेला स्कार्फ हा वेगळ्याच पद्धतीने बांधण्यात आल्यामुळे त्यांनी मला तेथून जाण्यास सांगितलं. मुळात बाहेर काढण्यामागचं हे कारणंही असू शकतं. पण, माझ्यासमक्ष येत कोणीच ते मला सांगितलं नाही, असं तिने एएनाय वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं.
वाचा : कंगनाने पुन्हा घेतला 'पंगा', यावेळी निमित्त होतं...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे त्या सोहळ्यातून निघून गेल्यानंतरच राबीहाला तिची पदवी देण्यात आली. ज्यामध्ये तिने सुवर्ण पदकाचा स्वीकार करण्यास नकार दिला. सुवर्ण पदक नाकारण्यामागचं अतिशय समर्पक कारण तिने यावेळी दिलं. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या हिंसेचा सामना करावा लागला त्यांच्या प्रती आदराची भावना म्हणून आपण हे सुवर्ण पदक न स्वीकारल्याचं तिने सांगितलं.