नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या वाढत्या चिंतेमुळे भारतात सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक पातळी गाठली आहे. इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचं बोललं जात आहे. शेअर बाजाराच्या घसरणीमुळे, सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वाढला आहे. बुधवारी दिल्ली सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर १,१५५ रुपयांनी वाढला. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. एक किलोग्रॅम चांदीचा भाव  १,१९८ रुपयांनी वाढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत व्याजदरात घट आणि कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या दहशतीमुळे गुंतवणूकदार सोन्यामधील सुरक्षित गुंतवणूकदारांना प्राधान्य देत आहेत. या कारणामुळे सोन्या-चांदीच्या दरात उच्चांकी वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. 


सोन्या-चांदीचा भाव -


बुधावारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ४३,२२८ रुपये प्रति दहा ग्रॅमनंतर, तो वाढून आता ४४,३८३ प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. सोन्याप्रमाणे चांदीचा दरही ४६,५३१ रुपयांवरुन, ४७,७२९ रुपये प्रति किलोग्रॅमवर झाला आहे. 


येत्या दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव अक्षरशः ५० हजारपर्यंत जाण्याची शक्यता सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सोने दर वाढीचं मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी उलथापालथ होते आहे. नोटबंदी पासूनच सोन्याच्या भावात प्रचंड बदल झाले असल्याचं सोने व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.


दरम्यान, कोरोनाच्या भीतीमुळे गेल्या आठवड्यात जगभरातील शेअर बाजाराला पाच लाख कोटी डॉलरपेक्षा अधिक नुकसान झालं आहे. यामुळे बाजारात एक दशकापेक्षा अधिक घसरण झाली आहे. बाजारांना झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह, बँक ऑफ जपान आणि रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने धोरणात्मक पावले उचलण्याची तयार केली आहे.