सोनं खरेदी करायचंय... हीच आहे योग्य वेळ!
सोन्याची स्थानिक बाजारातील मागणी घटली
मुंबई : दिवाळीनंतर सोन्याच्या दरात कमालीची घसरण बघायला मिळतेय. गेल्या दहा दिवसात दरामध्ये १६०० रुपयांची घट झालीय. दिवाळीच्या आधीच ३२ हजार ८०० रुपयांच्या घरात पोहचलेलं सोनं काल ३१ हजारावर येऊन ठेपलंय. काल मुंबईतल्या सोन्याचा दरचा ३० हजार ८०० रुपये होता. दिवाळीच्या निमित्तानं सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली. राज्यभरात दुष्काळाचं सावट असंल, तरी सोनं खरेदीचा उत्साह होता. दिवाळीनंतर येऊ घातलेल्या लग्नसराईसाठीही आठवडाभर बाजारात चांगली उभारी होती. पण गेल्या दहा दिवसात स्थानिक बाजारातील मागणी घटल्यानं दरात झपाट्यानं कपात होतेय. म्हणूनच सोन्याचे दर घसरल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान रुपया आणि डॉलरच्या किंमतीमधील चढ-उताराचाही सोन्याच्या बाजारावर परिणाम होत असतो. दरम्यान काल अचानक सोन्याच्या दरात आठशे रुपयांची वाढही नोंदवण्यात आलीय.
सध्या लग्नसराईही सुरू आहे. त्यामुळे बाजारात सोनं खरेदीची जोरदार उलाढाल सुरू आहे. तुम्हीही सोनं खरेदीसाठी योग्य संधी शोधत असाल तर हीच योग्य वेळ आहे... सराबा बाजाराच्या म्हणण्यानुसार, किरकोळ विक्रेत्यांसहीत सोन्याच्या मागणीत घट झालीय. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातही झालेल्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर दिसून येतोय.