सोन्याच्या दराने ओलांडला प्रतितोळा `इतका` विक्रमी आकडा
सोनं खरेदीच्या विचारात आहात, हे नक्की वाचा
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढणाऱ्या सोऩ्याच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी सोन्याच्या दरांचा आकडा अविश्वसनीय उंचीवर गेल्याची बाब सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाही, तोच आता या दरांनी आणखी एक उच्चांक ओलांडला आहे.
नवी दिल्लीमध्ये सोन्याच्या दरांत ४३० रुपयांनी वाढ झाली असून, हे दर ५०, ९२० ते ५१ हजारांच्या घरात पोहोचले आहेत. मंगळवारी हेच दर ५०,४९० च्या घरात होते. एकिकडे दिल्लीत सोन्याचे दर वाढत आहेत. तर, मुंबईमध्येही सोन्याच्या दरांनी अनेकांनाच घाम फुटत आहे. शेअर बाजारातील सर्व घडामोडी पाहता मुंबईमध्ये सोन्याचे दर ५२,३१५ रुपयांवर पोहोचले आहेत.
२५५० किंमतीच्या वाढीव दरामुळं दिल्लीमध्ये चांदीचे दर प्रति किलोमागे ६०,४०० रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. येथे हे दर १८५५ डॉलर तर, चांदी २१.८० डॉलरनं वाढली आहे. यंदाच्या वर्षी सोन्याच्या दरांमध्ये आतापर्यंत २८ टक्क्यांनी वाढ झाल्याची बाब लक्षात आली आहे.
सराफा बाजारामध्ये आणि आंतरराराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोने आणि चांदीच्या दरांमध्ये होणाऱ्या हालचाली पाहता येत्या काही दिवसांमध्ये हे दर पुन्हा एकदा विक्रमी आकड्यानं वाढतील असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.