खूशखबर ! या क्षेत्रात उपलब्ध होणार एक लाखाहून अधिक लोकांना रोजगाराच्या संधी
भारतात या क्षेत्रात मोठी रोजगाराची सधी उपलब्ध होणार आहे.
नवी दिल्ली : रोजगार हा भारतात महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक तरुण असे आहेत ज्यांना रोजगाराची योग्य संधी मिळाली नाही. पण आता नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने संसदीय समितीला सांगितले आहे की, येत्या दोन वर्षांत देशातील विमान वाहतूक क्षेत्रात एक लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळू शकतो.
सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या अहवालानुसार, मंत्रालयाने संसदीय समितीला सांगितले आहे की, अंदाजानुसार, सध्या विमान वाहतूक आणि वैमानिक उत्पादन क्षेत्रात सुमारे 2,50,000 लोक प्रत्यक्षपणे कार्यरत आहेत. या 2,50,000 कर्मचाऱ्यांमध्ये पायलट, केबिन क्रू, अभियंते, तंत्रज्ञ, विमानतळ कर्मचारी, ग्राउंड हँडलिंग, कार्गो, किरकोळ, सुरक्षा, प्रशासकीय आणि सेल्सच्या कर्मचार्यांचा समावेश आहे.
मंत्रालयाचा अंदाज आहे की 2024 पर्यंत हा आकडा 3,50,000 पर्यंत वाढू शकतो. मंत्रालयाने म्हटले आहे की, नागरी विमान वाहतूक क्षेत्रात अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे काम करणाऱ्या कामगारांचे प्रमाण 4:8 आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हवाई प्रवाशांची वाढती संख्या पाहता येत्या पाच वर्षांत आणखी 10,000 वैमानिकांची गरज भासेल.
रविवारीच नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, देशाचे विमान वाहतूक क्षेत्र प्रवासी, विमान आणि विमानतळांच्या बाबतीत अभूतपूर्व विकासासाठी सज्ज आहे. सन 2027 पर्यंत देशातील हवाई प्रवाशांची संख्या 400 दशलक्षपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.