भारतासाठी खुशखबर, कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण
अंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर प्रतिलिटर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली आहे. शनिवारपासून कच्च्या तेलाचे भाव १५ डॉलर प्रतिबॅरलनं कमी झाले आहेत. त्यामुळे प्रति बॅरल ३५.६५ डॉलर इतक्या भावानं कच्चं तेल उपलब्ध झालं आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाचा तेलाच्या किंमतीत एवढी मोठी घसरण झाल्याचं सांगितलं जातं आहे. विशेष म्हणजे कच्च्या तेलाचा दर १० डॉलरनं घसरला की भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर अर्ध्या टक्क्यानं सुधारतो. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं ही चांगली बातमी आहे.
अंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे प्रतिलिटर पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. शिवाय याचा परिणाम जगातील शेअर बाजारांमध्ये देखील दिसून येणार आहे. सेन्सेक्स तब्बल ११०० अंकांनी कोसळला आहे. तसेच निफ्टी देखील गडगडला असल्याचं चित्र समोर आलं आहे.
तेल पुरवठादार देशाची संघटना OPEC आणि रशियामध्ये एकमत होऊ न शकल्याने हे नवीन दर युद्ध सुरु झाले आहे. एकेकाळचा सहकारी असलेल्या रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध सुरु केले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे.