कुंभमेळ्याला जाणाऱ्यांसाठी रेल्वेची मोठी घोषणा
देशातील सर्व रेल्वे विभागांना आदेश
मुंबई : कुंभ मेळ्याला जाण्यासाठी रेल्वेचं तिकीट बुक करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेने कुंभ मेळ्याला जाणाऱ्या भाविकांसाठी त्यांच्याकडून घेतला जाणारा सरचार्ज अतिरिक्त शुल्क रद्द केला आहे. 11 डिसेंबरपासून तिकीटासोबत घेतला जाणारा सरचार्ज रेल्वे मंत्रालयाने रद्द केला आहे. ज्या भाविकांनी याआधीच बुकींग केलं आहे त्यांना देखील ते परत केले जाणार आहेत. देशातील सर्व रेल्वे विभागांना हा निर्णय त्वरीत लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काय आहे मेळा सरचार्ज
कोणत्याही ठिकाणी मेळा किंवा मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर रेल्वे अनेक सुविधा पुरवते. यावेळी प्रवाशांच्या तिकीटासोबत अतिरिक्त शुल्क आकारलं जातं. स्टेशनवर थांबवण्याची सुविधा, अतिरिक्त रेल्वे चालवणे, मुलभूत सुविधा पुरवणे, नवे काऊंटर सुरु करणे असे विविध कामं रेल्वे या दरम्यान करते. यासाठी मोठा खर्च होतो. हा खर्च रेल्वे मंत्रालय प्रवाशांच्या तिकीटामधूनच घेते. ज्याला सरचार्ज किंवा अतिरिक्त शुल्क देखील म्हणतात. ज्या प्रवाशांनी अॅडवान्समध्ये तिकीट बुकींग केलं आहे अशा प्रवाशांकडून टीटी प्रवासादरम्यान सरचार्ज वसूल करतात. पण रेल्वेने फेब्रुवारीमध्ये अलाहाबाद येथे होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी प्रवाशांकडून सरचार्ज न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे 800 गाड्या चालवणार
अलाहाबादममध्ये आयोजन होत असलेल्या अर्ध कुंभ मेळ्यासाठी भारतीय रेल्वे देशभरातून जवळपास 800 गाड्या चालवणार आहे. या वेळी कुंभ स्पेशल रेल्वे गाड्य़ांची ओळख वेगळी असेल. या गाड्यांवर 'कुंभ चलो'च्या घोषणा आणि डुबकी लावताना साधुंची फोटो असणार आहेत.
12 कोटी भाविक येणार
अर्ध कुंभचं आयोजन पुढच्या महिन्यापासून सुरु होत आहे. या दरम्यान 12 कोटी भाविक येतील अशी शक्यता आहे. उत्तर मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव चौधरी यांनी म्हटलं की, 'अलाहाबादच्या नियमित रेल्वेच्या डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. 800 विशेष गाड्या अलाहाबादसाठी चालवल्या जाणार आहेत. जवळपास 3 महिने हा मेळा चालणार आहे.