Google Layoffs: स्टार परफॉर्मर असतानाही गुगलने नोकरीवरुन काढलं, कर्मचाऱ्याने मांडली व्यथा, म्हणाला `मला उद्ध्वस्त...`
Google Layoffs: गुगलने (Google) नुकतंच 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. यानंतर अनेक कर्मचारी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपल्या भावनांना वाट करुन देत आहेत. हैदराबादच्या (Hyderabad) हर्ष विजयवर्गीय यांनीही आपण स्टार परफॉर्मर असतानाही कामावरुन काढून टाकल्याचं सांगत व्यथा मांडली आहे.
Google Layoffs: संपूर्ण जगावर मंदीचं (Recession) सावट असून अनेक मोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. ट्विटर (Twitter), फेसबुक (Facebook), अॅमेझॉन (Amazon) अशा अनेक मोठ्या कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. या आघाडीच्या कंपन्यांमध्ये गुगलचाही (Google) समावेश आहे. गुगलने नुकतंच 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढत बेरोजगार (Unemployed) केलं आहे. अचानक हातची नोकरी गेल्याने अनेक कर्मचाऱ्यांना धक्का बसला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्यथा मांडत आहेत. गुगलचे कर्मचारी हर्ष विजयवर्गीय यांनीही पोस्ट शेअर करत आपला अनुभव शेअर केला आहे.
हर्ष विजयवर्गीय मूळचे हैदराबादचे आहेत. कंपनीने ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे, त्यामध्ये हर्ष विजयवर्गीय यांचाही समावेश आहे. कंपनीने जेव्हा त्यांना कामावरुन काढून टाकल्याचा ई-मेल पाठवला तेव्हा त्यांना धक्काच बसला. हर्ष विजयवर्गीय यांना धक्का बसण्याचं कारण म्हणजे ते कंपनीचे स्टार परफॉर्मर होते. त्यामुळे कंपनीने जेव्हा त्यांना नोकरीवरुन काढत असल्याचा ई-मेल पाठवला तेव्हा त्यांनाही आपणच का? असा प्रश्न पडला होता. विजयवर्गीय यांनी लिंक्डइन (LinkedIn) आपला सर्व अनुभव शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की "माझा सर्वात पहिला प्रश्न होता की मीच का? या महिन्यात मी तर स्टार परफॉर्मर होतो. पण काहीच उत्तर मिळालं नाही".
"माझी आर्थिक योजना उद्ध्वस्त"
हर्ष विजयवर्गीय विवाहित असून त्यांना मुलगाही आहे. कंपनीने कामावरुन काढून टाकल्याने आपली आर्थिक योजना पूर्णपणे कोलमडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "दोन महिने मला अर्धाच पगार मिळणार आहे. माझी आर्थिक योजना संपुष्टात आली आहे. हे शनिवारी झालं असून, मला यातून सावरण्यासाठी दोन दिवस लागले. आता माझा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे," असं हर्ष विजयवर्गीय यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
याआधीही गुगलच्या अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरीवरुन अचानक काढून टाकल्यानंतर आपली व्यथा मांडली होती. गुडगाव येथील गुगल क्लाउड प्रोग्राम मॅनेजर आकृती वालिया यांनाही असाच अनुभव आला होता. त्यांनीही LinkedIn वर पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. त्यांनी लिहिलं होतं की "काही दिवसांपूर्वीच गुगलमध्ये मी पाच वर्ष पूर्ण केली होती. मी Googleversary म्हणून त्याचं सेलिब्रेशनही केलं होतं. पण लवकरच मला येथून निघून जावं लागेल असं वाटलं नव्हतं".
"माझ्या सिस्टमवर Access Denied असा मेसेज आल्यानंतर काय करावं हेच मला सुचत नव्हतं. कारण 10 मिनिटांनी होणाऱ्या एका मीटिंगसाठी मी तयारी करत होते. मीच का असा विचार माझ्या मनात आला," असं आकृती वालिया यांनी सांगितलं.