गुगलचा बाबा आमटेंना सलाम
समाजसेवेसोबतच त्यांनी साऱ्या देशाला एकजुटीने राहण्याचा संदेश दिला.
मुंबई : विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची दखल घेणाऱ्या गुगलने समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे म्हणजेच अनेकांच्या आदर्शस्थानी असणाऱ्या बाबा आमटे यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त गुगलकडून सुरेख असं डूडल साकारण्यात आलं आहे.
स्लाईड शोच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या या डुडलमध्ये बाबा आमटे यांच्या समाजकार्याची झलक दाखवण्यात आली आहे. गरजू आणि विशेष म्हणजे कुष्टरोग झालेल्या वर्गासाठी झटणाऱ्या आणि समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत खासगी आयुष्यापेक्षा समाजालाच प्राधान्य देणारे बाबा हे अनेकांचेच प्रेरणास्त्रोत आहेत.
१९१४ मध्ये जन्मलेल्या बाबा आमटे यांनी एकदा एका कुष्टरोग्याला पाहिलं आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य पुरतं बदलून गेलं. या एका घटनेनंतर त्यांनी आपलं सारं आयुष्य हे इतरांच्याच सेवेसाठी अर्पण केलं. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी आनंदवन नावाच्या संस्थेची स्थापना करत जनसेवेचा विडा उचलला.
भुकेलेल्याची भूक भागवत, आजाऱ्यांची पीडा जाणत आणि निराधारांना आधार देत बाबा आमटे नावाचा हा वटवृक्ष दिवसागणिक आपल्या कामाने विस्तारत गेला आणि समाजात एक वेगळा आणि कधीही विस्मृतीत जाणार नाही असा आदर्श निर्माण करुन गेला.
राष्ट्रीय एकात्मतेवर विश्वास ठेवणाऱ्या बाबांनी १९८५ मध्ये भारतभ्रमण केलं होतं. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचा प्रवास केला होता. या यात्रेदरम्यानच त्यांनी साऱ्या देशाला एकजुटीने राहण्याचा संदेश दिला.
समाजसेवेमध्ये बाबांच्या या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना १९७१ मध्ये पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर, १९८८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागाकडूनही त्यांना सन्मानित करण्यात आलं. १९९९ मध्ये ते शांती पुरस्काराचे मानकरी ठरले. याशिवाय इतरही बऱ्याच पुरस्कारांनी त्यांच्या कामाची दाद देण्यात आली. कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजहितासाठीच झटणाऱ्या बाबा आमटे यांनी उभं केलेलं जनसेवेचं हे जग आणि हा वारसा आज असंख्य जण पुढे नेत आहेत.