कसं ओळखाल, नोट खरी की खोटी?
या गोष्टींकडे लक्ष द्याच
मुंबई : विविध बँकांकडून खातेधारकांना आता १०० रुपयांची नवी नोट देण्यात येत आहे. ही नोट सध्या चलनात आली असून, बऱ्याच एटीएममध्येही ती उपलब्ध झाली आहे. पण, या नव्या नोटेविषयी असणाऱ्या काही गोष्टी मात्र जाणून घेण्याची गरज असल्याचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे.
मोठ्या प्रकणात बनावट नोटांचं वाढचं जाळं पाहता ही सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचं आता स्पष्ट होत आहे.
२०१७ आणि २०१८ या वर्षांत बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर जप्त केल्यामुळे आता भारतीय रिजर्व्ह बँकतर्फे या नोटेविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे ती नोट खरी आहे की बनावट याचा लगेचच निष्कर्ष लावता येणार आहे.
या मार्गांनी जाणून घ्या तुमच्याकडे असणारी नोट खरी आहे की खोटी
१०० रुपयांच्या नोटेच्या समोरच्या भागात देवनागरी लिपीत १०० हा आकडा छापण्यात आला आहे.
नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधी यांचं छायाचित्र असून, लहान अक्षरांमध्ये RBI, भारत, India आणि १०० असं लिहिण्यात आलं आहे. त्यासोबतच या नोटेवर एक सिक्युरिटी थ्रेडही आहे.
ज्यावेळी ही नोट दुमडली जाईल तेव्हा त्या हिरव्या थ्रेडचा रंग निळा होऊन जाईल.
नोटेच्या मागच्या भागात तिचं छपाईचं वर्ष, स्वच्छ भारत अभियानाचा लोगो, भाषा पॅनल, रानी की वॉव या ठिकाणाचं चित्र छापण्यात आलं आहे.
नोटेविषयी देण्यात आलेल्या या प्राथमिक माहितीशिवाय paisaboltahai.rbi.org.in या लिंकवरही आरबीयाकडून महत्त्वाची माहिती पुरवण्यात आली आहे. तेव्हा आता तुमच्या हातात शंभर रुपयांची ही नोट आल्यानंतर ती खरी आहे की बनावट असा प्रश्न पडल्यास वरील गोष्टी ध्यानात नक्की आणा.